नितीन कांबळे
अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्याने मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. आष्टी तालुक्यात शासकीय खरेदी केंद्रांची कमतरता आणि तातडीच्या पैशाच्या गरजेमुळे शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना मागेल त्या दरात विकावा लागत आहे. (Kapus Kharedi)
सरकारने साडेसहा हजार रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्षात बाजारात तो भाव मिळत नाही. काळवंडलेला कापूस, घटलेले उत्पादन आणि वाढता खर्च या सर्वांनी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.(Kapus Kharedi)
आष्टी तालुक्यातील शेतकरी यंदा पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा बळी ठरले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासकीय खरेदी केंद्रांची अपुरी संख्या आणि तातडीच्या पैशाच्या गरजेमुळे शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीचा कापूस खासगी व्यापाऱ्यांना मागेल त्या दरात विकावा लागत आहे. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक जवळपास थांबली आहे.
पिके हातची गेली
यंदा आष्टी तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे कपाशीचे क्षेत्र लक्षणीय घटले आहे. पहिल्याच तोडणीतील कापूस पावसात भिजल्याने काळवंडला असून, फक्त एक-दोन गोण्या घेऊन शेतकरी बाजारात पोहोचत आहेत. सध्या बाजारभाव साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल असला, तरी प्रत्यक्षात गुणवत्तेमुळे भाव कमी मिळत असल्याने शेतकरी निराश आहेत.
रस्त्यावर वजन काटे गायब
गेल्या वर्षी चौका-चौकात कापूस खरेदीसाठी व्यापाऱ्यांचे काटे उभे असायचे, मात्र यंदा रस्त्यांवर एकही काटा दिसत नाही. अतिवृष्टीमुळे उत्पादन घटल्याने खरेदीदारांनीसुद्धा पाऊल मागे घेतले आहे.
उत्पादन खर्चही निघत नाही
शेतकऱ्यांनी उसनवारी करून कापूस लागवड केली, मात्र पिके भिजल्याने आणि काळवंडल्याने उत्पादन खर्चही परत मिळत नाही. दिवाळीसाठी दोन पैसे मिळतील, लेकराबाळांना गोडधोड खाता येईल अशी आशा होती, पण सगळं पाण्यात गेलं.- संजय खंडागळे, शेतकरी
माझ्या दोन एकर शेतातील कपाशी पिके वाहून गेली. पैसा मोकळा होईल, हे स्वप्नच पाण्यात गेले. पदरी आता फक्त निराशा आहे.- भास्कर शिरसाठ, शेतकरी
जिल्ह्यातील नुकसानाचे चित्र
आष्टी तालुक्यात सुमारे ६ हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण दीड लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली असली, तरी अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणावर पिके पाण्यात गेली आहेत.
हमीभाव आणि वास्तवात अंतर
शासनाने यंदा कापसाला ६ हजार ५०० ते ८ हजार ५०० प्रती क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र बाजारात गुणवत्तेतील फरक आणि खासगी व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना भावात मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
अतिवृष्टी, पूर, आणि बाजारातील मंदी या तिहेरी संकटाने शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडले आहेत. दिवाळीच्या तोंडावर शेतकरी वर्गावर आर्थिक संकट कोसळले असून, शासनाने तत्काळ खरेदी केंद्रे वाढवून योग्य भावात खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शासनाचा हमीभाव कागदावरच!
“कापूस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी साडेसहा हजारांचा हमीभाव जाहीर झाला असला, तरी तो फक्त कागदावर आहे. बाजारात भाव पडले आहेत, आणि शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करायचीही ताकद उरलेली नाही,” अशी खंत स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.