Kapus Kharedi : केंद्र सरकारकडून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा यासाठी कापूस महामंडळ (CCI) मार्फत खरेदी केली जाते. (Kapus Kharedi)
मात्र, यावर्षी कापूस विक्रीसाठी नवीन ॲप्स बंधनकारक करण्यात आल्याने राळेगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.(Kapus Kharedi)
तांत्रिक अडचणी, उशिरा मिळालेली मान्यता आणि नोंदणीतील त्रुटींमुळे अनेक शेतकरी हमीभावापासून वंचित राहिले असून त्यांना खासगीत कमी दराने कापूस विकावा लागला आहे.(Kapus Kharedi)
२८ हजारांहून अधिक शेतकरी, मात्र निम्म्यांनाच लाभ
राळेगाव तालुक्यात एकूण २८ हजार ४४२ शेतकरी असून त्यापैकी बहुतांश शेतकरी कापूस उत्पादक आहेत. यातील २२ हजार शेतकऱ्यांनी 'ॲग्रीस्टॉक' ॲपवर नोंदणी केली होती.
सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी राळेगाव केंद्रावर ११,६६५ तर खैरी केंद्रावर (वाढोणा संलग्नित) ५,८०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. अशा प्रकारे एकूण १७,४६७ शेतकऱ्यांनी ॲपवर नोंदणी केली होती.
मात्र प्रत्यक्षात यापैकी फक्त ९,२६४ शेतकऱ्यांनीच सीसीआयला कापूस विक्री करता आली. या शेतकऱ्यांकडून सुमारे १ लाख ७४ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. हाच काय तो यावर्षी शेतकऱ्यांना मिळालेला दिलासा ठरला आहे.
१८ टक्के शेतकऱ्यांचा कापूस रिजेक्ट
ॲपमधील तांत्रिक अडथळे, कागदपत्रातील त्रुटी आणि वेळेवर मान्यता न मिळाल्यामुळे ३,०७२ शेतकऱ्यांचा (सुमारे १८ टक्के) कापूस थेट रिजेक्ट करण्यात आला. याशिवाय सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांना सीसीआय व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वेळेत मान्यता न मिळाल्याने ते हमीभावाने कापूस विकू शकले नाहीत.
खासगीत ५०० ते १,००० रुपये कमी दराने विक्री
सीसीआयकडे कापूस विक्री न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना ५०० ते १,००० रुपये प्रति क्विंटलने कमी दराने विकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.
मागील वर्षांपर्यंत सीसीआयकडून साध्या पद्धतीने आणि वेळेवर नोंदणी करून मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी केली जात होती.
मात्र यंदा नवीन ॲप्स सक्तीचे केल्याने विक्री प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला.
भाव वाढले, पण कापूस शिल्लकच राहिला नाही
१० जानेवारीनंतर कापसाच्या दरात वाढ झाली असली तरी तोपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कापूस शिल्लक राहिलेला नव्हता. त्यामुळे उशिरा झालेल्या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता फारच कमी झाली आहे.
व्यापाऱ्यांना फायदा, शेतकरी अडचणीत
राळेगाव तालुक्यात सुमारे ४६ हजार क्विंटल क्षेत्रात कापसाचा पेरा आहे. आतापर्यंत खासगीत जवळपास ३ लाख क्विंटल, तर सीसीआयमार्फत १ लाख ७४ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस शिल्लक नाही. मात्र व्यापाऱ्यांनी आधीच खरेदी करून साठवून ठेवलेला कापूस गंज्यांमध्ये पडून आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे, तर व्यापाऱ्यांनाच होणार असल्याचे चित्र आहे.
अचूक आकडा सांगणे कठीण
अनेक शेतकरी आपला कापूस एकापेक्षा अधिक वेळा विक्रीसाठी आणतात. काही नोंदणी केलेले शेतकरी खासगीतही कापूस विकतात. त्यामुळे सीसीआयला विक्रीसाठी प्रत्यक्ष किती शेतकरी शिल्लक होते, याची अचूक संख्या सांगणे कठीण आहे.- सुजित चल्लावार, कृषी उत्पन्न बाजार समिती, राळेगाव
हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : शासकीय केंद्रांवर आवक का कोसळली? काय आहे कारण वाचा सविस्तर
