संतोष सारडा
राज्य शासनाने यावर्षी कापूस खरेदीसाठी सुरू केलेल्या ऑनलाइन (online) नोंदणी प्रक्रियेला बदनापूर तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. (Kapus Kharedi)
शासनाच्या नव्या प्रणालीबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम असून, इंटरनेट व तांत्रिक ज्ञानाचा अभाव ही प्रमुख कारणे ठरत आहेत. परिणामी, मोठ्या उत्पादन क्षेत्र असूनही, नोंदणीची संख्या अत्यंत कमी आहे.(Kapus Kharedi)
फक्त २ हजार ३३८ शेतकऱ्यांची नोंदणी
तालुक्यात यंदा तब्बल ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. खरीप क्षेत्रापैकी ४५ टक्के क्षेत्र कापूस आहे. मात्र, शासनाने सक्ती केलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत आजपर्यंत केवळ २ हजार ३३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली, अशी माहिती बाजार समितीतून देण्यात आली.(Kapus Kharedi)
नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत होती. नंतर ही मुदत ३१ ऑक्टोबर आणि आता थेट ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तरीही प्रतिसाद अपेक्षेइतका मिळत नाही.(Kapus Kharedi)
शेतकऱ्यांचा गोंधळ वाढणार
ऑनलाइन प्रक्रिया अवघड – मार्गदर्शन शून्य
मोबाइल, इंटरनेट, वेबसाइट, ओटीपी प्रक्रिया यांचे ज्ञान नसल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी नोंदणी करू शकत नाहीत.
गावपातळीवर बाजार समिती किंवा कृषी विभागाकडून कोणतेही प्रभावी मार्गदर्शन न झाल्याने परिस्थिति आणखी गुंतागुंतीची झाली आहे.
वाहन वेळेत न मिळाल्यास खासगी व्यापारीच पर्याय
नोंदणी झाल्यानंतर निश्चित तारखेप्रमाणे कापूस आणण्यासाठी वाहन उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांना मजबुरीने खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात कापूस विकावा लागतो.
बाजार समितीत सुविधा अपुऱ्या
कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना खालील सुविधा अत्यंत कमकुवत आहेत
वाहन पार्किंगची कमतरता
आसनव्यवस्था नाही
पिण्याचे पाणी नाही
रात्रीसाठी पथदिवे नाहीत
मागील वर्षी जिनिंगवरून कापूस भरलेले वाहन चोरीला गेल्याची मोठी घटना घडली होती. त्यामुळे यंदा अधिक सुरक्षा आवश्यक असल्याची मागणी आहे.
वजनात घोटाळे
ग्रामीण बाजारात सुरू असलेल्या खरेदीमध्ये वजनातील तफावतीच्या तक्रारी वारंवार येतात. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी वजन-मापे विभागाने व्यापाऱ्यांचे काटे तपासून अद्ययावत करण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
* गावागावात जनजागृती मोहीम
* आठवडी बाजारात प्रचार मोहीम
* बाजार समितीत स्वतंत्र कक्ष
* ऑनलाइन नोंदणीसाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करावेत
* सुरक्षित खरेदी प्रक्रियेसाठी उपाययोजना
कापूस खरेदी सुरू; १ हजार ६३२ क्विंटल खरेदी
तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६३२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. मात्र नोंदणी कमी असल्याने खरेदी प्रक्रियेचा वेग मंदावला आहे.
