पांढरकवडा : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत सुरू असलेल्या कापूस खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या चुकीच्या ऑनलाइन नोंदणीमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. (Kapus Kharedi)
कापूस विक्रीसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग करताना शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष उपलब्ध कापसाचेच वजन नोंदवावे, अंदाजे अथवा जास्त प्रमाण टाकू नये, असे महत्त्वाचे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.(Kapus Kharedi)
सध्या सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टलवर स्लॉट बुकिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक शेतकरी स्लॉट बुक करताना प्रत्यक्षापेक्षा अधिक वजनाची नोंद करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. (Kapus Kharedi)
प्रत्यक्षात मात्र विक्रीच्या वेळी कमी प्रमाणात कापूस बाजारात आणला जातो. परिणामी सीसीआयच्या जिनिंग क्षमतेवर याचा थेट परिणाम होत आहे.(Kapus Kharedi)
'सीसीआय'ची कापूस खरेदी प्रक्रिया ही जिनिंग युनिटच्या प्रतिदिन क्षमतेनुसार चालते. स्लॉट बुकिंगदरम्यान नोंदविण्यात आलेल्या एकूण वजनावरून जिनिंगची दैनंदिन मर्यादा निश्चित केली जाते. (Kapus Kharedi)
काही शेतकऱ्यांनी जास्त वजनाची नोंद केल्याने पोर्टलवर जिनिंगची क्षमता पूर्ण झाल्याचे दिसून येते. मात्र प्रत्यक्षात तेवढा कापूस येत नसल्याने ही क्षमता वाया जाते आणि ज्यांच्याकडे कापूस तयार आहे अशा इतर शेतकऱ्यांना स्लॉट मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कापूस विक्रीपासून वंचित राहतात.(Kapus Kharedi)
दरम्यान, सीसीआय कापूस खरेदीसाठी 'किसान कपास' ॲपवर नोंदणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहेत. सातबारा उतारा, आधार कार्ड किंवा छायाचित्र स्पष्ट नसल्याने संबंधित शेतकऱ्यांना ॲपवर संदेश पाठविण्यात आले आहेत. अशा शेतकऱ्यांनी त्वरित ॲपवर लॉगिन करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना अद्याप नोंदणीस मंजुरी मिळालेली नाही, त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह थेट कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
स्लॉट बुकिंग करताना चुकीची माहिती भरल्यास इतर शेतकरी बांधवांचे नुकसान होते. सर्व शेतकऱ्यांना कापूस विक्रीची समान संधी मिळावी, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे आणि अचूक माहिती नोंदवावी.- सुरेश खांदनकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पांढरकवडा
कापूस खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळावे, यासाठी शेतकऱ्यांनी जबाबदारीने व प्रामाणिकपणे नोंदणी करण्याची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
