Kapus Kharedi : अकोला जिल्ह्यात भारतीय कापूस महामंडळाने (CCI) कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, यंदा कापूस विक्रीपूर्वी शेतकऱ्यांना 'कपास किसान' ॲपवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Kapus Kharedi)
नोंदणी झाल्यानंतरच संबंधित बाजार समित्या शेतकऱ्यांची माहिती पडताळून विक्रीस परवानगी देणार आहेत. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये युजर आयडी नोंदणीसाठी मोठी धावपळ सुरू आहे. (Kapus Kharedi)
फक्त १३ हजार नोंदी; एक लाख हेक्टरवर लागवड
अकोला जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. मात्र, अद्यापपर्यंत फक्त १३ हजार २५७ शेतकऱ्यांनीच 'कपास किसान' अॅपवर नोंदणी केली आहे.
नोंदणीसाठी शासनाने ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आता केवळ १४ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. नोंदणी न झाल्यास शेतकऱ्यांना कापूस विक्रीत अडचणी निर्माण होऊ शकतात.
नोंदणीशिवाय विक्री अशक्य
सीसीआयच्या नियमानुसार, 'कपास किसान' ॲपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच केंद्रावर कापूस विक्री करता येईल. नोंदणीदरम्यान शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणीमध्ये कापसाचा उल्लेख केलेला असणे आवश्यक आहे.
विक्रीवेळी सादर केलेले कागदपत्र खरे असल्याची पडताळणी बाजार समित्या करणार आहेत.
बोगस कागदपत्र आढळल्यास शेतकऱ्यांचा कापूस तात्काळ रोखण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तालुकावार नोंदणीचा आढावा (प्रमुख तालुके)
अकोला : ३,७७६ शेतकरी
चिखलगाव : ३३६ शेतकरी
तेल्हारा : १,१९६ शेतकरी
पारस : ७२१ शेतकरी
मूर्तिजापूर : ३,७०० शेतकरी
ॲपवर नोंदणी झाल्यानंतर विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे कागदपत्र तपासले जाणार आहेत. बोगस कागदपत्र आढळल्यास कापूस रोखला जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला युजर आयडी क्रमांक देण्यात आला आहे.- जी. पी. साबळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना सूचना
३१ ऑक्टोबरपूर्वी 'कपास किसान' ॲपवर नोंदणी पूर्ण करा
ई-पीक नोंदणीमध्ये कापसाचा तपशील अनिवार्य
केंद्रावर विक्रीवेळी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहा
बोगस माहिती दिल्यास कापूस रोखला जाईल.