अनिलकुमार मेहेत्रे
पैठण तालुक्यातील पाचोड आणि बालानगर येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर या हंगामात खरेदीची गती वाढली असून आतापर्यंत ८०९ शेतकऱ्यांकडून तब्बल १८ हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाली आहे. ही माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे यांनी दिली.(Kapus Kharedi)
अतिवृष्टीचा फटका, तरीही शेतकऱ्यांची कापूस विक्रीला गर्दी
पैठण तालुक्यात कापूस हे मुख्य नगदी पीक असून मोठ्या प्रमाणात पेरा केला जातो. यंदा सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले, उत्पादन घटले. तरीही वाचलेला कापूस शेतकरी विक्रीसाठी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात आणत आहेत. सीसीआयद्वारे पाचोड आणि बालानगर येथे खरेदी केंद्रे सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात 'कपास किसान ॲप'वर नोंदणी केली आहे.
५,६५९ नोंदणी, परंतु ३,२२८ शेतकरी अजून प्रतीक्षेत
'कपास किसान ॲप'वर तालुक्यातील ५ हजार ६५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ हजार ६५९ शेतकऱ्यांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली असून त्यांना विक्रीसाठी मान्यता मिळाली आहे. मात्र, दुबारा नोंदणी, अपूर्ण कागदपत्रे आणि तांत्रिक त्रुटी यांमुळे ३ हजार २२८ शेतकरी अद्याप प्रतीक्षा यादीत आहेत.पूर्ण कागदपत्रांची पूर्तता होताच या शेतकऱ्यांनाही क्रमांक दिला जाणार असल्याची माहिती बाजार समितीकडून देण्यात आली.
कापूस खरेदी दर
मध्यम स्टेपल कापूस : ७ हजार ७१० प्रति क्विंटल
लांब स्टेपल कापूस : ८ हजार ११० प्रति क्विंटल
सीसीआयने खरेदी प्रक्रिया नियमित सुरू ठेवली असून, कापूस असल्यास शेतकऱ्यांनी विलंब न करता नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
खरेदी मर्यादा १८ क्विंटलपर्यंत वाढवण्याची मागणी
सध्या सीसीआयने ठरवलेल्या नियमानुसार प्रति हेक्टर १२ क्विंटलपर्यंतच कापूस खरेदी केली जाते. अतिवृष्टीनंतर हवामान अनुकूल झाल्याने काही भागांत पुढील आठवड्यांत उत्पादन वाढू शकते. त्यामुळे ही मर्यादा १२ वरून १८ क्विंटलपर्यंत वाढवावी, अशी ठाम मागणी उपसभापती राम एरंडे यांनी केली आहे. शेतकरी वाचला तरच शेती वाचेल, त्यामुळे मर्यादा वाढवणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
योग्य कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक
'कपास किसान ॲप' वरील नोंदणी प्रक्रिया शेतकऱ्याकडे कापूस असेपर्यंत सुरू राहणार आहे. परंतु योग्य कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.- नितीन विखे, सचिव, बाजार समिती
नव्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
पीक पेरा युक्त २०२५-२६ डिजिटल सातबारा
आधार कार्ड
स्पष्ट फोटो
योग्य कागदपत्रे मिळताच बाजार समिती आणि सीसीआय त्वरित मंजुरी देत आहेत. खरेदी प्रक्रियेत कोणताही विलंब होत नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
सध्याची परिस्थिती काय?
दोन केंद्रांवर खरेदी व्यवस्थित सुरू
८०९ शेतकऱ्यांकडून १८,००० क्विंटल खरेदी
हजारोंची नोंदणी पूर्ण, पण तांत्रिक कारणांमुळे अनेक प्रतीक्षेत
शेतकऱ्यांकडून खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी तीव्र
