रुपेश उत्तरवार
यवतमाळसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतकरी कापूस विक्रीसाठी उत्सुक आहेत. दिवाळी जवळ येत असल्याने शेतकरी आपल्या कापसाची विक्री करून सणासुदीच्या तयारीसाठी तसेच मजुरांच्या मजुरीसाठी पैसा उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत.( Kapus Kharedi)
मात्र, सीसीआयकडून सुरू झालेल्या कापूस खरेदीत ॲप नोंदणीचा पेच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. 'कपास किसान' ॲपवर नोंदणी केल्याशिवाय खरेदीसाठी मान्यता मिळत नाही, आणि मान्यता न मिळाल्यास कापूस खरेदी केंद्रावर विक्री शक्य नाही. ( Kapus Kharedi)
यामुळे अनेक केंद्रांवर खरेदीचा शुभारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात एकही शेतकरी कापूस विक्रीसाठी आणू शकलेला नाही.
दरातील तफावत शेतकऱ्यांना गोंधळात टाकणारी
धामणगाव रेल्वे येथे खुल्या बाजारात कापसाला ७ हजार १०० प्रति क्विंटल दर मिळत आहे, तर सीसीआयच्या केंद्रांवर हमीभाव ८ हजार १०० प्रति क्विंटल इतका आहे. म्हणजेच १ हजार ची तफावत असूनही शेतकऱ्यांना उच्च दर मिळवता येत नाही.
राज्यात १६८ खरेदी केंद्रांवर कापूस खरेदीचा शुभारंभ झाला, पण नोंदणी आणि मंजुरीतील तांत्रिक अडथळ्यांमुळे विक्री ठप्प झाली आहे.
शेतकऱ्यांची काय मागणी?
शेतकऱ्यांचा आग्रह आहे की ॲपवरील तांत्रिक प्रक्रिया सुलभ करून प्रत्यक्ष केंद्रांवर नोंदणीची सोय करावी, जेणेकरून वेळेवर विक्री करता येईल आणि दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळेल.