रूपेश उत्तरवार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, भारतीय कपास महामंडळ (CCI) ने कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. (Kapus Kharedi)
याआधी ही अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर होती. मात्र, ठराविक कालावधीत फक्त पाच लाख शेतकऱ्यांनीच नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली, तर लाखो शेतकरी अजूनही या प्रक्रियेपासून वंचित राहिले होते. (Kapus Kharedi)
नोंदणी आणि स्लॉट बुकिंग प्रक्रिया
कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता कापूस किसान मोबाइल ॲप किंवा संबंधित पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी झाल्यानंतर स्लॉट बुकिंग प्रणाली सुरू होते.
शेतकऱ्यांना ७ दिवसांच्या रोलिंग चेन पद्धतीने स्लॉट मिळणार.
दररोज एक तारीख बंद होईल आणि नवीन तारीख सुरू होईल.
या प्रणालीमुळे खरेदी केंद्रांवर होणारा गोंधळ टाळता येईल.
छत्रपती संभाजीनगर शाखेसाठी स्लॉट बुकिंग शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होत आहे.
विदर्भातील स्थिती : नोंदणी अपूर्ण
यवतमाळ, अकोला आणि इतर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये नोंदणी प्रक्रिया अत्यंत मंदावलेली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरताना दस्तऐवजातील माहिती चुकीची टाकली.
काहींनी शासकीय अध्यादेश क्रमांक किंवा इतर माहिती चुकीने भरल्याने नोंदणी अमान्य झाली.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पुन्हा नवी नोंदणी करावी लागत आहे.
या पार्श्वभूमीवर मुदतवाढीमुळे दुरुस्तीची संधी आणि नव्याने नोंदणीची प्रक्रिया अधिक सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कापूस किसान ॲपद्वारे सुविधा
भारतीय कपास महामंडळाने सुरू केलेल्या 'कापूस किसान' मोबाइल ॲप वरील लिंकद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे.
स्लॉट बुकिंग व नोंदणी प्रक्रियेत मदत करणाऱ्या सूचना मिळणार आहेत.
शेतकऱ्यांचा सल्ला
शेतकऱ्यांनी नोंदणी करताना खालील बाबींची काळजी घ्यावी
* दस्तऐवजातील तपशील नीट तपासून भरावा.
* आधार, ७/१२ उतारा, बँक पासबुकवरील माहिती एकसमान असावी.
* ॲपवरील तारीख व वेळ लक्षात घेऊन स्लॉट बुकिंग करावे.
* मुदतवाढीचा फायदा घेऊन वेळेत नोंदणी पूर्ण करावी.
