Join us

Kanda Lagvad : लोडशेडिंगचा फटका, कसमादे पट्ट्यात रात्रीच्या वेळी कांदा लागवड, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 15:18 IST

Kanda Lagvad : शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड (Kanda Lagvad) करत असल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

Kanda Lagvad : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बहुतांश भागात परतीच्या पावसाच्या फटक्यामुळे कांदा रोपे (Onion Plants) उशिरा लागवडीला आली. त्यामुळे सद्यस्थितीत कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. मात्र, आठवड्यातील तीन दिवस रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने ऐन रात्री तेही कडाक्याच्या थंडीत लागवड (Onion Cultivation) करण्याची वेळी शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. 

उशिराच्या पावसाने आगात टाकलेली सर्व रोपे खराब (Plant Damage) झाली. त्यामुळे तिसऱ्या व चौथ्यांदा शेतकऱ्यांना कांदा रोपे टाकावी लागली आणि एकत्र रोपे टाकल्यामुळे एकत्र लागवडीला आली. म्हणून मजूर टंचाई निर्माण झाली. अशातच डिसेंबर महिन्यात वीज वितरण कंपनीच्या वतीने आठवड्यातील तीन दिवस रात्री १० ते सकाळी ६ असे वीज पुरवठ्याचे धोरण (Load shedding) राबवले जात आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ कांदा लागवडीच्या कालावधीत शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान आठवड्यातील फक्त चारच दिवस शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याने या कालावधीतच फक्त कांदा लागवड करता येते. रात्रीच्या वेळेत वीज असलेल्या दिवशी मात्र शेतकऱ्यांना लागवड करता येत नाही. महागडी रोपे असल्याने त्यांची वाढ व उगवण क्षमता योग्य दिसून येत नसल्याने व ढगाळ वातावरणाने लागवडीला आलेली रोपे खराब होत आहेत. त्यामुळे रात्रीची जोखीम पत्करून या कडाक्याच्या थंडीत अनेक शेतकऱ्यांना कांदा लागवड करावी लागत आहे.

रात्रीची कांदा लागवड रात्रीच्या वेळेस वीज असलेल्या दिवशी अनेक शेतकरी शेतात विजेची व्यवस्था करत कांदा लागवडीची तजवीज करत कांदा लागवड करत आहेत. मजूर रात्रीच्या वेळी कांदा लागवडीला जुमानत नाहीत. विजेअभावी अधिकची मजुरी देत लागवड उरकावी लागते. कडाक्याच्या थंडीत रात्रीची कांदा लागवड करत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 

दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा करा 

शेतकरी संदीप शेवाळे म्हणाले की, किमान कांदा लागवडीसाठी दिवसा पूर्णवेळ वीजपुरवठा सुरू ठेवून शेतकरी हिताचे धोरण कंपनीने राबविणे गरजेचे आहे. तर भाऊसाहेब मोरे म्हणाले की, भारनियमनाच्या चुकीची वेळ कांदा लागवडीसाठी अडचणीची ठरत आहे. महागडी कांदा रोपे, तसेच मजूर टंचाई यामुळे सर्वच बाजूने पिळवणूकच होत आहे. 

Agriculture News : अवकाळी पाऊसग्रस्त डाळींब बागेची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डलागवड, मशागतपेरणी