नाशिक : दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात अवघ्या ३५ दिवसांत १ लाख १४१ मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे. १०.४३ टक्के साखर उतारा मिळत १ लाख ४ हजार ५७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखान्याचा इथेनॉल प्रकल्पही पूर्ण क्षमतेने सुरू असून, १० लाख ७३ हजार ३१२ लिटर रेक्टिफाइड स्पिरिट (आर.एस.) आणि ५१ हजार ४० लिटर इंप्युअर स्पिरिट उत्पादन होत ६ लाख ३३ हजार ५५३ लिटर इथेनॉलची निर्मिती झाल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे.
कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळप करण्याच्या उद्दिष्टातून कारखाना प्रशासन नियोजन करत आहे. कार्यक्षेत्रात ऊस टोळ्या वाढवण्यात येत असून, मार्चअखेर सर्व ऊसतोड पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ऊसतोड कार्यक्रमानुसार कार्यवाही सुरू आहे.
कारखान्याच्या सीड फार्ममध्ये उसाच्या विविध जातींची रोपे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बनविण्यात येत असून, उधारीने रोपांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात आली असून, उधारीने खत विक्रीदेखील सुरू आहे.
कादवा सहकारी साखर कारखाना भविष्यातही सक्षमपणे सुरू राहण्यासाठी सर्व सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी आणि आपल्या कारखान्यालाच उसाचा पुरवठा करावा, असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे व व्हा. चेअरमन शिवाजीराव बस्ते यांनी केले आहे.
उधारीने रोपांचे वाटप
सीड फार्ममध्ये उसाच्या विविध जातींची रोपे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बनविण्यात येत असून, उधारीने रोपांचे वाटप करण्यात येत आहे.
