Jowar MSP Payment Delay : रब्बी हंगामात आधारभूत किमतीवर विकलेली ज्वारीची रक्कम अद्याप न मिळाल्याने कळंब तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत. (Jowar MSP Payment Delay)
तब्बल चार महिने उलटूनही शासनाने उर्वरित ज्वारीच्या खरेदीचा चुकारा देय केलेला नाही, त्यामुळे शेतकरी नाराज असून लवकरात लवकर थकीत रक्कम देण्याची मागणी होत आहे.(Jowar MSP Payment Delay)
किती ज्वारी, किती थकीत रक्कम?
शासनाने या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ३ हजार ३७१ रुपये प्रति क्विंटल या आधारभूत दराने ४ हजार ८४० क्विंटल ज्वारी खरेदी केली होती.
एकूण देयक रक्कम होती १ कोटी ६३ लाख १५ हजार ६४० रुपये.
मात्र, आतापर्यंत फक्त २४ शेतकऱ्यांना म्हणजेच विकलेल्या १ हजार २३६ क्विंटल ज्वारीचे ४१ लाख ६७ हजार ४३२ रुपये अदा झाले.
उर्वरित ३ हजार ६०३ क्विंटल ज्वारीचे तब्बल १ कोटी २१ लाख ४८ हजार २०८ रुपये अजूनही थकीत आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी संकट
या भागात अतिवृष्टी व रोगराईमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली पिके अजूनही काढणीसाठी तयार नाहीत.
कर्जफेड, बियाणे, खत, औषधे यासाठी पैशांची तीव्र टंचाई आहे.
त्यातच विकलेल्या ज्वारीचे पैसे थकीत राहिल्याने शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या कोंडीत सापडला आहे.
पिकांचे नुकसान, सततची आर्थिक जुळवाजुळव आणि त्यात थकीत चुकारा या सगळ्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. शेतकरी संघटनांनी सरकारने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन थकीत रक्कम वितरित करण्याची मागणी केली आहे.
मी चार महिन्यांपूर्वी २३ क्विंटल ज्वारी शासनाला विकली. अजूनही पैसे मिळालेले नाहीत. अशीच स्थिती अनेक शेतकऱ्यांची आहे. शासनाने हक्काचे पैसे तातडीने द्यावेत.- सुदाम पवार, शेतकरी, किन्हाळा
शेतकऱ्यांनी विकलेल्या ज्वारीचे पैसे मिळावे यासाठी पाठपुरावा शासनस्तरावर सुरू आहे. लवकरच थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा आहे.- धीरज स्थूल, तहसीलदार, कळंब