नाशिक : शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ तालुक्यांतील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत असून याअंतर्गत जिल्ह्यात एकूण ८ हजार २६९ मृत खातेदारांची संख्या आढळून आली आहे. ई-हक्क प्रणालीत वारस नोंदीचे २८११ अर्ज प्राप्त झाले आहेत. २२५१ वारस ठराव करण्यात आले आहेत. त्यातील १५२८ नोंदी मंजूर करण्यात आल्या आहेत.
'जिवंत सातबारा मोहीम' (Jivant Satbara Mohim) अंतर्गत किती प्रकरणे प्रलंबित आहेत याचा साप्ताहिक अहवाल सादर करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांनी (प्रशासन) १५ तालुक्यांना दिल्या होत्या. त्यानुसार सुरगाण्यात सर्वाधिक ९९२ मृतांची संख्या असून ७४ वारसनोंद अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जानुसार ५२ वारस ठराव (Varas Nond) निर्णय करण्यात आले असून, वारस फेरफार नोंदीसाठी ५२ प्रकरणे दाखल आहेत.
त्यापैकी २८ मंजूर करण्यात आली असून, २४ प्रकरणे कागदपत्रांअभावी नामंजूर करण्यात आली आहेत. त्याखालोखाल त्र्यंबकेश्वर ८९७, निफाड ८५७, सिन्नर ८१६ मृत खातेदारांची नोंद करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.
असा आहे कार्यक्रम...
६ एप्रिल ते २० एप्रिल :
वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञा लेख, स्वयंघोषणापत्र, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसदारांचे वय, पत्ते व दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासी पुरावा तलाठीकडे सादर करणे बंधनकारक आहे. तलाठ्यांनी स्थानिक पातळीवर चौकशी करावी.
२१ एप्रिल ते १० जून :
तलाठ्यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करवा त्यानंतर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार ७/१२ दुरुस्त करावा. त्यानंतर सर्व जिवंत व्यक्ती ७/१२ वर नोंदविलेल्या असतील.