Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो! वीज मीटर सुस्थितीत आहे ना? वीज बिल तपासून घ्या? अशी करा तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 16:20 IST

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी वीज मीटरची तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. 

नाशिक : शेतीसाठी वीज ही अत्यंत महत्वाचे साधन असून अनेकदा वीज मीटर मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. वीज मीटर बंद पडलेले असेल किंवा मीटर रीडिंग घेता येणे शक्य नसेल अशावेळी ग्राहकांना अंदाजित वीज बिल पाठविले जाते. घर बंद असल्यामुळे आलेल्या सरासरी वीज बिल दिले तरी पुढील बिल सुरळीत होते; परंतु वीजमीटरच बंद असतानाही मीटर बदलले नाही तर अशा ग्राहकांना सरासरी वीज बिल दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी वीज मीटरची तपासणी करून घेणे आवश्यक ठरते. 

महावितरणकडून अचूक वीज मीटर दुरुस्तीचा दावा अनेकदा केला जातो. यासाठीच्या यंत्रणा सक्षम असल्याचे देखील सांगितले जाते, मात्र तरीही वीज बिलातील घोळ कमी होताना दिसत नाही. अशातच मीटर सुरू किंवा बंद असतानाही अनेकदा ग्राहकांना सरासरी वीज बिल पाठविले जाते. वीज मीटर सुरू परंतु काही कारणास्तव मीटर रीडिंग करताच आले नाही तर अशावेळी सरासरी वीज बिल दिले जाते. ज्यांचे वीज मीटरच बंद आहे, अशा ग्राहकांना देखील अंदाजित वीज बिल दिले आहे. या ग्राहकांनी वीज मीटर बदलून घेणे अपेक्षित असते. बऱ्याचदा वीज मीटरमध्ये अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात किंवा त्यामध्ये काहीसा बिघाड होतो, परंतु ही बाब ग्राहकांच्या लक्षात येत नाही, मीटर बंद असते, तरीही त्यांना कल्पना नसते. 

वीज ग्राहकांची संख्या 

नाशिक जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक १० लाख ५३ हजारांच्या पुढे आहे. शहरी भागात घरगुती ग्राहकांची संख्या वाढल्याने वीज जोडप्या वाढल्या आहेत. मीटर रीडिंग होत नसल्यामुळे ग्राहकांना सरासरी वीज बिल दिले जाते. तर जिल्‌ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील ग्राहकांची संख्या २५ हजार ७३ हजार इतकी आहे. नाशिक, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, देवाला, पेट, गोदे, इगतपुरी येथे औद्योगिक वसाहती असून काही नव्याने विकसित झालेल्या औद्योगिक वसाहती आहेत. तेथेही वीजपुरवठा सुरु आहे. तसेच दुकानदार, आस्थापना संस्था यांना वाणिज्यिक ग्राहकाप्रमाणे विजेचे दर आकारले जातात. जिल्ह्यातील वाणिज्यिक ग्राह‌कांची संख्या जवळपास दीड लाख इतकी आहे.

तीन लाख कृषी ग्राहक

नाशिक जिल्ह्यातील कृषी ग्राहकांची संख्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्राहक संख्या आहे. जिल्ह्यातील कृषी ग्राहक ३ लाख ५० हजार इतकी आहे. अनेक ग्राहकांना अंदाजित वीजबिल अनेकविध कारणांमुळे ग्राहकांना अंदाजित वीज बिल दिले जाते. सर्कल कार्यालयानुसार अशा ग्राहकाची संख्या कमी अधिक प्रमाणात असून या ग्राहकांच्या वीज बिलावर तशी सूचना दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपली वीज मीटर तपासणी करणे महत्वाचे ठरते. जेणेकरून वीज बिलात कुठलाही अडथळा येणार नाही. 

तक्रार कोठे कराल?

आपले वीज मीटर बरोबर आहे किंवा नाही, याची दक्षता ग्राहकांनी घ्यावी. याशिवाय मीटर रीडिंग करणारी व्यक्ती मीटर बंद असल्याची माहिती ग्राहकांना देतात. त्याची दखल घेऊन ग्राहकांनी वीज मीटर बदलले पाहिजे. मीटरसाबत काही तकार असेल तर मीटर बदलासाठी देखील अर्ज करता येतो. मीटर नादुरुस्त झाले असेल, ज्यामुळे रीडिंगची आकडेवारी स्पष्ट होत नसेल तर मीटर दुरुस्तीसाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयात अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. वीज मीटर संदर्भात असलेली तक्रार असेल किंवा अंदाजित वीज बिल आकारले जात असाल तर संबंधित शाखा कार्यालयात किंवा सर्कल कार्यालयात जाऊन याबाबतची कल्पना देता येऊ शकते किंवा महावितरणच्या अॅपवर देखील तक्रार नोंदविता येते.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा… 

टॅग्स :शेतीभारनियमनबिलशेतकरी