Agriculture News : खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बी पिकांचे नियोजन करताना उत्पादनात घट येते, म्हणून पुर्वमशागतीची कामे गरजेनुसार कमीत कमी प्रमाणात करावीत. पिक पद्धती निवडत असता जमिनीचा प्रकार लक्षात घ्यायला हवा.
रब्बी हंगामात सलग पिकाएवजी आंतरपीक पद्धतीचा (उदा. रब्बी ज्वारी करडई (६:३), करडई + हरभरा (६:३)) अवलंब केल्यास उत्पन्नामध्ये स्थिरता राहते. तसेच हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. तसेच रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती अधिक फायदा देणाऱ्या आहेत.
रब्बी हंगामात कोरडवाहू परीस्थित जास्त उत्पादन देणाऱ्या आणि वातावरणातील तफावतीला कमी बळी पडणाऱ्या जातीची निवड करावी. पावसाचा ताण सहन करणाऱ्या व कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित वाणांची निवड करावी.
रब्बी हंगामातील सुर्यफुल व करडई पिकांचे शिफारस करण्यात आलेले सुधारित आणि संकरित वाण पुढीलप्रमाणे आहेत.
सुर्यफुल - सुधारित वाण- मोडर्न, फुले भास्कर, भानू, संकरित वाण एल.एस.एफ.एच.-१७१, ३५
करडई - फुले कुसुमा, एस.एस.एफ.-७०८, फुले करडई, फुले चंद्रभागा, फुले नीरा, फुले भिवरा
या कालावधीत जमिनीमध्ये पेरणीयोग्य परिस्थिती नसल्यास रब्बी हंगामातील पिकांची पेरणी ३० ऑक्टोबरपर्यंत करता येते. भात कापणी नंतर उतेरा पीक पद्धतीनुसार किंवा उर्वरित ओलाव्यावर वाटाणा, जवस, मसूर, हरभरा, चवळी इ. पिके घेण्यात यावीत.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी
