केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नवी दिल्ली स्थित भारत मंडपम इथे आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन 2025च्या निमित्ताने IS 19262 : 2025 ‘शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स — चाचणी संहिता’ या भारतीय मानकाचे अनावरण केले.
IS 19262 : 2025 ‘शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर्स — चाचणी संहिता’ हे मानक एकसमान संज्ञा, सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे तसेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर करण्यात येणाऱ्या पीटीओ शक्ती, ड्रॉबार शक्ती, पट्टे व पुलींची कार्यक्षमता चाचण्यांबाबत सर्व संबंधित भागधारकांमध्ये एकसमान समज निर्माण करते. यामध्ये कंपन मोजमाप, तपशील पडताळणी तसेच इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विविध घटक व जोडणीची तपासणी यांचाही समावेश आहे.
या मानकासाठी IS 5994:2022 ‘कृषी ट्रॅक्टर — चाचणी संहिता’ तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित करण्यात आलेल्या संबंधित वाहन उद्योग मानकांचा तांत्रिक आधार घेण्यात आला असून, कृषी वापरायोग्य रूपांतर करण्यात आले आहे. अधिकृत चाचणी संस्थांमार्फत IS 19262:2025 ची अंमलबजावणी झाल्यास देशात शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा व्यापक स्वीकार सुलभ होईल, स्वच्छ कृषी तंत्रज्ञानातील नवोन्मेषाला चालना मिळेल आणि उत्सर्जनात घट होऊन शेती क्षेत्रात निरंतर यांत्रिकीकरणास हातभार लागेल.
IS 19262:2025 मध्ये निर्धारित केलेल्या प्रक्रियांद्वारे निर्माण होणारा चाचणी डेटा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या कार्यक्षमता आणि सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांचे मूल्यांकन करण्यासाठी वैज्ञानिक आधार प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे. हा डेटा भविष्यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी विशिष्ट स्वीकार निकष आणि अनुरूपता मूल्यांकन योजनांच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. संरचित व एकसमान चाचणी प्रक्रिया निर्धारित करून, हे मानक उत्पादकांना विश्वासार्ह आणि सुरक्षित उत्पादने देण्यास पाठबळ देणे, तसेच शेतकरी व ग्राहकांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या कार्यक्षमता आणि क्षमतेबाबत अधिक विश्वास प्रदान करण्याचे उद्देश ठेवते.
शेतीसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर हे भारताच्या कृषी यांत्रिकीकरण नियोजनातील एक उदयोन्मुख आणि महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. हे ट्रॅक्टर पारंपरिक डिझेल इंजिनांऐवजी बॅटरी पॅकद्वारे चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर वाहतुकीसाठी तसेच शेतीतील इतर कामांसाठी करतात. बॅटरी तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक मोटर आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये झपाट्याने प्रगती झाल्यामुळे अलीकडच्या वर्षांत इलेक्ट्रिक ट्रॅक्टरमध्ये लक्षणीय विकास झाला आहे. कार्यक्षम आणि सक्षम यंत्रांची निर्मितीची क्षमता निर्माण झाली आहे.
हे ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक ट्रॅक्टरला पर्याय देतात. कमी उत्सर्जन, कमी परिचालन खर्च आणि सुधारित कार्यक्षमता असे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे लाभ आहेत. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतात होणारे उत्सर्जन पूर्णपणे दूर करतात, त्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास आणि शेतीच्या कामांची कार्बन फूटप्रिंट घटण्यास मदत होते.
कमी आवाज आणि उत्सर्जनाचा अभाव यांमुळे शेतात दीर्घकाळ काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देतात. तसेच, डिझेल इंजिनांच्या तुलनेत कमी हालचाल करणारे भाग असल्यामुळे, या ट्रॅक्टरना कमी देखभाल लागते, परिचालन खर्च कमी होतो आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारते. कृषी क्षेत्रातील डिझेलचा वापर कमी करण्यास हे ट्रॅक्टर हातभार लावतात. जीवाश्म इंधनाचा वापर कमी झाल्यामुळे डिझेल उत्पादनासाठी लागणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचाही वापर कमी होतो.
देशात इलेक्ट्रिक कृषी ट्रॅक्टरला मागणी वाढत असताना, त्यांच्या कार्यक्षमता, सुरक्षितता आणि विश्वासार्हतेचे सुसंगत पद्धतीने मूल्यांकन करण्यासाठी समर्पित आणि सुसंगत चाचणी प्रक्रियांचा अभाव ही एक आव्हानात्मक बाब ठरली होती. या गरजेला प्रतिसाद म्हणून तसेच कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाच्या प्राधान्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मानके विकसित करण्याच्या विनंतीनुसार, बीएसआयने यासाठी भारतीय मानकाची निर्मिती हाती घेतली.
या मानकाच्या निर्मिती प्रक्रियेत इलेक्ट्रिक ट्रॅक्टर उत्पादक, चाचणी व प्रमाणन संस्था, संशोधन व शैक्षणिक संस्था तसेच कृषी अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी तंत्रज्ञानातील तज्ज्ञ अशा प्रमुख भागधारकांचा सक्रिय सहभाग होता. भारत सरकारचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भोपाळस्थित आयसीएमआर अर्थात केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था,बुधनी येथील केंद्रीय कृषी यंत्रसामग्री प्रशिक्षण व चाचणी संस्था, नवी दिल्ली स्थित ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण संघटना, पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया आणि नवी दिल्लीतील ऑल इंडिया फार्मर्स अलायन्स आदींच्याप्रतिनिधींनी मानक विकास प्रक्रियेदरम्यान महत्त्वपूर्ण योगदान दिले.
स्वेच्छेने केलेल्या या मानकाची अधिसूचना ही कृषी क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी भारतीय मानक चौकटीला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि कृषी यांत्रिकीकरणाबाबत विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाहांशी देशांतर्गत पद्धती सुसंगत करण्यास यामुळे मदत होईल.
