गडचिरोली : जिल्ह्यातील जंगलाधारित व स्थानिक कच्च्या मालावर आधारित सीताफळाचा ज्यूस, जांभूळ ज्यूस, नैसर्गिक मध आणि अंबाडीचे लोणचे या उत्पादनांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू केला आहे.
उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांनी तयार केलेली ही उत्पादने केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता मुंबईसह थेट तेलंगणा राज्यातही पोहोचली असून, त्यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे. ३०० महिलांना रोजगारही मिळाला.
या प्रदर्शनात कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील 'संगिनी' महिला ग्रामसंघाने सादर केलेल्या जांभूळ ज्यूसने खवय्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. नैसर्गिक पद्धतीने प्रक्रिया केलेल्या या ज्यूसची चव, रंग आणि आरोग्यदायी गुणधर्मामुळे मोठी मागणी आहे.
गडचिरोलीच्या खाद्यसंस्कृतीची गोडी
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सीताफळ, जांभूळ, मथ व अंबाडी या नैसर्गिक साधनसंपत्तीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्यावर भर देण्यात आला आहे. स्वच्छता, गुणवत्ता आणि स्थानिक चवीचा ठसा जपत ही उत्पादने तयार केली जात असून, आकर्षक पॅकिंगमुळे त्यांना बाजारात वेगळी ओळख मिळत आहे. या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याची खाद्यसंस्कृती हळूहळू राज्याबाहेर पोहोचू लागली आहे.
मे, जून व जुलै या कालावधीत महिला जंगलातून जांभूळ गोळा करतात. त्यावर प्रक्रिया करून ते फ्रीजमध्ये साठवले जाते. नंतर त्यापासून ज्यूस तसेच पावडर तयार करून बाजारात पाठवली जाते.
- छाया बोरकर, उद्योग सखी, उमेद
