जळगाव : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत यावर्षी थंडीने मोठी भर घातली आहे. भडगाव तालुक्यात तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यामुळे 'नवती' केळी पिकाला मोठा फटका बसला असून, पाने पिवळी पडणे आणि पोगा करपण्याचे प्रमाण वाढले आहे.
यावर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली. प्रती एकर सुमारे १ लाख ३० हजार रुपयांपर्यंत खर्च करूनही, निसर्गाच्या लहरीपणामुळे केळीची झाडे वाळू लागली आहेत.
पिकांच्या वाढीसाठी २५ अंशांपेक्षा जास्त तापमान आवश्यक असते, मात्र कडाक्याच्या थंडीमुळे झाडांची वाढ पूर्णपणे थांबली आहे. रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर आणि महागड्या फवारण्या करूनही बागा जोम धरत नसल्याने, हताश झालेले शेतकरी आता उभ्या बागा उपटून टाकण्याच्या मानसिकतेत आहेत.
थंडीपासून संरक्षणासाठी कृषी विभागाचा सल्ला
- रात्रीच्या वेळी बागेला पाणी द्यावे आणि सकाळी ओला कचरा जाळून बागेत धूर करावा, जेणेकरून तापमान संतुलित राहील.
- नायट्रोजनयुक्त खते टाळून झाडाला पोटॅशियम, जस्त आणि फेरस सल्फेट (१० ग्रॅम प्रति झाड) द्यावे.
- तसेच, २५० ते १००० ग्रॅम कडुलिंब पेंड वापरावी.
- मुळांना थंडीपासून वाचवण्यासाठी वाळलेले गवत किंवा काळ्या पॉलिथिनचे आच्छादन करावे.
- केळीच्या घडांना ६ टक्के छिद्र असलेल्या प्लास्टिक पिशव्यांनी झाकावे.
- बागेच्या कडेला शेवरी किंवा तुतीसारखी वारा रोधक झाडे लावावीत.
- केळी बागांचे नुकसान टाळण्यासाठी भडगाव तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांनी शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
