यवतमाळ : वीज तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने शेतातील ऊस जळाला. वीज कंपनीने शेतकऱ्याला नुकसानभरपाई नाकारली. अखेर ग्राहक आयोगाने कंपनीला चपराक देत शेतकऱ्याला भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणात निर्णय देताना विद्युत निरीक्षकांचा अहवाल महत्त्वाचा ठरला.
महागाव तालुक्यातील सवना येथील सचिन आबासाहेब देशमुख व आबासाहेब देसाई साहेब देशमुख यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या शेतातून लघुदाब वीज वाहिनी गेली आहे. २९ ऑक्टोबर २०१८ रोजी तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उसावर पडल्या.
यामध्ये देशमुख यांच्या शेतातील उसाचा कोळसा झाला. सुमारे सात लाख ३५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी विद्युत कंपनीकडे भरपाई मागितली. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. न्याय मिळावा यासाठी अखेर ग्राहक आयोगात दाद मागण्यात आली.
विद्युत निरीक्षकांचा अभिप्राय बंधनकारक
देशमुख यांच्या शेतातील ऊस जळाल्यानंतर विद्युत निरीक्षकाने अहवाल सादर केला. विद्युत संच मांडणीवर योग्य निगा, देखभाल दुरुस्ती केली नाही. त्यामुळे अपघात झाला. आगग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, त्यामुळे भरपाई द्यावी, असा अहवाल विद्युत निरीक्षकाने दिला होता. याच आधारे आयोगाने शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आहे.
असा आहे आदेश
विद्युत कंपनीने तक्रारकर्ते सचिन देशमुख व आबासाहेब देशमुख यांना नुकसानभरपाईबद्दल ७५ हजार रुपये शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल १५ हजार आणि तक्रार खर्चाबद्दल दहा हजार रुपये द्यावे, असा आदेश दिला आहे. शेतातून गेलेल्या विद्युत तारा अनेक ठिकाणी लोंबकळत आहे.
योग्यरीत्या ओढल्या गेल्या नसल्यामुळे त्यात घर्षण होते. याच प्रकारातून शेतमालाचे नुकसान होण्याच्या घटना अलीकडे वाढत चालल्या आहे. कंपनीकडून भरपाई देण्यासही टाळाटाळ केली जाते. आयोगाच्या या निर्णयावरून विद्युत कंपनी धडा घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ग्राहक आयोगात मागितला न्याय
विद्युत कंपनीकडून भरपाईच्या दृष्टीने काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने सचिन देशमुख, आबासाहेब देशमुख यांनी संयुक्तपणे यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. पुसद येथील कार्यकारी अभियंता महागाव येथील उपकार्यकारी अभियंता आणि सवना येथील कनिष्ठ अभियंता यांच्याविरोधात ही तक्रार होती. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अमृता वैद्य यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली.
Read More : Gharkul Yojana : 'या' घरकुल लाभार्थ्यांना ५० हजारांचे वाढीव अनुदान मिळणार, निधी वितरणास मान्यता
