HTBT Cotton Seeds : अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी वेगाने सुरू असताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. (HTBT Cotton Seeds)
शासनमान्यता नसलेल्या बीजी-३ (एचटीबीटी) कापूस बियाण्यांचा वापर टाळावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.(HTBT Cotton Seeds)
कृषी विभागाच्या माहितीनुसार, सध्या शासनाने केवळ बीजी-१ आणि बीजी-२ (बोलगार्ड-२) या कापूस वाणांना मान्यता दिली आहे.
मात्र, बाजारात ‘राउंडअप बीटी’, ‘चोर बीटी’, ‘वीडगार्ड’ किंवा एचटीबीटीसारखी बियाणे मोठ्या प्रमाणावर विकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बियाणे पूर्णपणे बेकायदेशीर असून पर्यावरण आणि शेतीसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात आले आहे.
बोगस बियाण्यांचा वाढता धोका
बेकायदेशीर बियाण्यांची विक्री प्रामुख्याने विनापावती आणि जादा दराने केली जाते. अशा पॅकेटवर बियाण्यांची गुणवत्ता, तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नसते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते.
अशा प्रकारची विक्री किंवा लागवड आढळल्यास त्वरित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी खात्रीही प्रशासनाने दिली आहे.
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत:
* बियाणे केवळ परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत
* खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे
* बिलावर पीक, वाण, लॉट क्रमांक आणि कंपनीचे नाव तपासावे
* बियाण्यांचे पॅकेट पूर्णपणे सीलबंद असल्याची खात्री करावी
* पॅकेटवरील उगवणीची अंतिम मुदत तपासावी
* अधिकृत शासनमान्य चिन्ह असल्याची खात्री करावी
बीजी-२ बियाण्यांचा पर्याय
सध्या बीजी-२ (बोलगार्ड-२) वाणाची किंमत सुमारे ९०१ रुपये असून सर्व वाणांमध्ये तंत्रज्ञान समान असल्याने विशिष्ट ब्रँडचा आग्रह धरण्याची गरज नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच पूर्व हंगामी लागवड टाळावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
बेकायदेशीर एचटीबीटी बियाण्यांचा मोह टाळून अधिकृत आणि प्रमाणित बियाण्यांचा वापर केल्यासच शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल आणि कायदेशीर अडचणींपासूनही बचाव होईल.
प्रशासनाचा इशारा
बोगस बियाण्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता अधिकृत बियाण्यांचाच वापर करावा. -राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
