HTBT Cotton Seeds : अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी येथे शुक्रवारी (२४ मे) सायंकाळी कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित एचटीबीटी (HTBT) कपाशी बियाण्याची मोठी पाकिटे जप्त करण्यात आली. (HTBT Cotton Seeds)
या कारवाईत सुमारे १.८० लाख रुपये किमतीची १११ बियाण्याची पाकिटे गोदामातून आणि चारचाकी वाहनाच्या डिक्कीतून सापडली. (HTBT Cotton Seeds)
ही धाड मंगलमूर्ती कृषी केंद्रालगतच्या गोदामात टाकण्यात आली. कारवाईवेळी त्या कृषी केंद्र चालकाच्या वाहनाचीही तपासणी करण्यात आली. वाहनात 'ग्लायफो गार्ड' व 'आरआर ६५९' नावाची बियाण्याची पाकिटे सापडली. संपूर्ण बियाण्याचा साठा जप्त करण्यात आला असून, बियाणे विक्री कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(HTBT Cotton Seeds)
गुजरात कनेक्शन पुन्हा एकदा समोर
विशेष म्हणजे ही गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील पाचवी मोठी कारवाई असून, या सर्व प्रकरणांमध्ये बियाण्यांचा गुजरात कनेक्शन समोर आले आहे. परतवाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी रात्री दीड वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल?
ही कारवाई विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय पाटील यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. ग्लायफोफार्म (गुजरात) या कंपनीसह राहुल विजय अग्रवाल याच्याविरुद्ध बियाणे कायद्याचे विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कारवाईचं नेतृत्व यांनी केले
या धाडसत्रात एसडीओ (कृषी) प्रफुल्ल सातव, संजय पाटील (निरीक्षक), प्रवीण खर्चे (जि.प. मोहीम अधिकारी), अक्षय क्षीरसागर (TAO) आणि रविकांत उईके (AO) यांच्यासह कृषी विभागाचे पथक सहभागी होते.
HTBT विक्रीचा गोरखधंदा : कृषी केंद्र चालकच मुख्य सूत्रधार?
या कारवाईतून असे दिसून आले की, प्रतिबंधित बियाण्याच्या विक्रीत कृषी केंद्रचालकच सक्रियपणे सहभागी आहेत. कृषी केंद्रालगत गोदामात आणि स्वतः च्या वाहनात साठा आढळणे ही बाब गंभीर असून, कृषी विभाग अधिक तपास करत आहे.
शेतकऱ्यांना इशारा
* HTBT बियाण्याची खरेदी/विक्री कायद्याने निषिद्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत व प्रमाणित बियाणेच विकत घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
* HTBT बियाण्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीस केंद्र शासनाकडून मंजुरी नाही. या प्रकारच्या बियाण्यांचा वापर केल्यास शेतकऱ्यांनाही कारवाईचा सामना करावा लागू शकतो.