गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुका धानशेतीसाठी ओळखला जातो. मात्र, बदलत्या हवामानामुळे धानपिकात होणारे नुकसान, खर्चवाढ आणि उत्पन्नातील अनिश्चितता यामुळे शेतकरी नवे पर्याय शोधू लागले आहेत. अशाच परिस्थितीत सिरेगावबांध येथील अभियंता तथा विद्यमान उपसरपंच हेमकृष्ण संग्रामे यांनी त्यांच्या साडेचार एकर क्षेत्रात आंबा व पेरूची आधुनिक पद्धतीने लागवड करून शाश्वत शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
संग्रामे यांची एकूण साडेसहा एकर शेती असून, परंपरागत धान शेतीला पूरक पर्याय म्हणून त्यांनी फळबागेकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेती घरालगत असल्याने स्वतः लक्ष देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी फळबाग विकसित केली आहे. या फळबागेत केशर, दशहरा, लंगडा, हापूस, तोतापुरी, ललित, कलेक्टर अशा १० ते १५ जातींच्या आंब्यांची लागवड केली आहे.
त्याचबरोबर तायवान पिंक, व्ही.एन.आर., ९-५ या सुधारित जातींच्या जांबाची झाडेही लावण्यात आली आहेत. योग्य अंतर, ठिबक सिंचन, मल्चिंग आणि खत व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. धानशेतीत कधी कधी खर्चही निघत नाही. अतिवृष्टी, दुष्काळ आणि रोगराई यामुळे उत्पन्नात मोठी घट होते.
त्यामुळे दीर्घकालीन व स्थिर उत्पन्नासाठी फळबागेचा मार्ग निवडल्याचे हेमकृष्ण संग्रामे यांनी सांगितले. त्यांचा हा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असून, परंपरागत शेतीला पर्याय शोधणाऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
