Join us

शेतं गेलं, घर गेलं, काहीच उरलं नाही, अन् सरकार शेतकऱ्याला 7 हजार रुपये देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 20:08 IST

Maharashtra Flood : शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले असून अंगातील कपड्यांशिवाय काहीच उरलं नसल्याचे पाहायला मिळत आहे.

Maharashtra Flood :    अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जून ते ऑगस्ट २०२५ दरम्यान अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान वाटपाचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला ७ हजार रुपये मिळणार आहेत. 

राज्यातील धाराशिव, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले असून अंगातील कपड्यांशिवाय काहीच उरलं नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री मंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत मदत देत असल्याचे सांगितले. 

ते म्हणाले की, आतापर्यंत अतिवृष्टीग्रस्त ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २२१५ कोटी रुपये मदत दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यापैकी १८२९ कोटी रुपये जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आले असून येत्या ८ ते १० दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होईल. तशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. 

अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेली पिके बरबाद झाली आहेत. गोठे पडले आहेत. जनावरे वाहून गेलेली आहेत. शेती खरवडून गेलेली आहे. शेतमजुरांचा रोजगार संपुष्टात आलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ७ हजार रुपये मदत देणे हे त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. सरकारने याचा पुनर्विचार करावा. निकष अटी व शर्तींच्या पलीकडे जात भरीव मदत शेतकऱ्यांना करावी. प्रति एकर किमान ५० हजार रुपये मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व श्रमहानी मोबदला म्हणून शेतमजुरांना प्रति कुटुंब तातडीची २५ हजार रुपयाची मदत सरकारने जाहीर करावी. - डॉ अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा

टॅग्स :पाऊसपूरमहाराष्ट्रशेती क्षेत्रमराठवाडा