Harbhara Bhaji : यंदा थंडी उशिरा दाखल झाल्याचा परिणाम रब्बी पिकांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र या बदलत्या हवामानातही हरभऱ्याच्या ताज्या भाजीला सध्या चांगले दिवस आले असून, अर्धापूर तालुक्यात ही भाजी प्रति किलो ८० ते १०० रुपये दराने विकली जात आहे.(Harbhara Bhaji)
ग्रामीण भागात विशेष आवडीने खाल्ली जाणारी हरभऱ्याची भाजी सध्या आठवडी बाजारात दाखल झाली असून, मागणीत सातत्याने वाढ होत आहे.(Harbhara Bhaji)
हिरवीगार, कोवळी आणि चविष्ट असल्यामुळे हरभऱ्याची भाजी घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. जरी ही भाजी दररोजच्या वापरात नसली, तरी हंगामात ग्रामीण भागात ती आवर्जून घेतली जाते. (Harbhara Bhaji)
विशेष म्हणजे ताजी भाजी वापरल्यानंतर उरलेली भाजी वाळवून पुढील काळासाठी साठवण्याची पारंपरिक पद्धत आजही अनेक कुटुंबांमध्ये प्रचलित आहे.
कौशल्य आणि कष्टाचे काम
हिवाळ्यात थंडी योग्य प्रमाणात जाणवू लागल्यास हरभऱ्याच्या पिकाची वाढ जोमाने होते. पाण्याचा योग्य ताळमेळ राहिल्यास पिकाला भरपूर टहाळ येतात.
यानंतर हरभऱ्याचे कोवळे शेंडे खुडण्याचे काम सुरू होते. मात्र हे काम अत्यंत कौशल्याचे आणि कष्टाचे असते. रोपाच्या मुळाला धक्का लागू नये किंवा ओढ पडू नये यासाठी फक्त अंगठ्याच्या सहाय्यानेच शेंडे खुडावे लागतात, अशी माहिती शेतकरी सांगतात.
बाजारात उशिरा आगमन
साधारणतः ऑक्टोबर महिन्यापासून थंडीची चाहूल लागते. मात्र बदलत्या हवामानामुळे यंदा थंडीचे दिवस अनियमित ठरले. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी जाणवू लागल्याने रब्बी हंगामातील पिकांची वाढ उशिरा झाली. परिणामी हरभऱ्याची भाजीही नेहमीपेक्षा उशिरा बाजारात दाखल झाली आहे. सध्या आठवडी बाजारात आवक वाढत असून, पुढील एक महिना ही भाजी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.
दुहेरी उत्पन्न देणारे हरभरा पीक
हरभऱ्याच्या झाडाचे शेंडे तोडल्यानंतर झाडाची वाढ अधिक चांगली होते. त्यामुळे नव्या फुटव्यांची संख्या वाढते आणि पुढे भरघोस धान्य उत्पादन मिळते. यासाठी अनेक शेतकरी महिला मजुरांच्या मदतीने शेंडे काढत आहेत. हरभरा हे दुहेरी उत्पन्न देणारे पीक असल्यामुळे शेतकरी या पिकाचा पेरा अधिक घेत असल्याचे दिसून येत आहे.
हरभरा खुडणीतून रोजगाराची संधी
हरभऱ्याच्या भाजीमुळे ग्रामीण भागात अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेषतः महिला शेतमजूर हरभऱ्याची भाजी खुडून थेट बाजारात विक्री करीत असून, त्यातून त्यांना चांगला आर्थिक फायदा होत आहे.
हरभऱ्याच्या भाजीमुळे हाताला काम मिळत आहे. शेंडे खुडून विक्री केल्याने घरखर्चाला हातभार लागतो.- दादाराव वाघमोडे, शेतकरी
एकूणच, थंडी उशिरा दाखल झाली असली तरी हरभऱ्याच्या भाजीने ग्रामीण बाजारपेठेत रंगत आणली असून, शेतकरी आणि मजुरांसाठी हा हंगाम दिलासा देणारा ठरत आहे.
हरभऱ्याच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे
* पचनशक्ती सुधारते
* अॅनिमिया कमी करण्यास मदत
* रोगप्रतिकारशक्ती वाढवते
* हृदयासाठी फायदेशीर
* वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत
* हाडे व स्नायू मजबूत करतात
* मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त
सेवनाबाबत सूचना
* नेहमी ताजी व स्वच्छ भाजी वापरावी
* जास्त प्रमाणात कच्ची खाल्ल्यास गॅस होऊ शकतो
* हलकी फोडणी किंवा वाफवून खाल्ल्यास पचनास सोपी
