बाळासाहेब माने
राज्यात हमीभावाने हरभरा खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच बारदान्याच्या तीव्र तुटवड्यामुळे खरेदीचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. (Harabhara Kharedi)
परिणामी, हजारो शेतकरी आपला हरभरा विक्रीसाठी प्रतीक्षेत असून, अनेकांना नाईलाजास्तव खासगी बाजारात कमी दराने माल विकावा लागत आहे. (Harabhara Kharedi)
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.(Harabhara Kharedi)
बारदान्याचा तुटवडा; खरेदी केंद्रांवर 'माप' बंद
राज्यातील बहुतांश हमीभाव केंद्रांवर सध्या बारदाना उपलब्ध नसल्याने खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे खरेदी केंद्रांवर माप बंद ठेवण्याची वेळ आली आहे.
पावसाळी वातावरण आणि आर्थिक गरजांमुळे शेतकऱ्यांना माल साठवून ठेवणे शक्य नसल्याने ते कमी दरात विक्री करण्यास मजबूर होत आहेत.
निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना
पूर्वी बारदाना खरेदीचे अधिकार मार्केटिंग फेडरेशन (MSCF) कडे होते. त्यामुळे आवश्यकतेनुसार तातडीने बारदाना उपलब्ध होत होता.
मात्र, पणन मंत्र्यांनी ही प्रक्रिया स्वतः कडे केंद्रीत केल्याने आता सर्व केंद्रांना पणन विभागाच्या पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. वेळेत बारदाना न मिळाल्याने संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
७ लाख क्विंटल खरेदी; तरी १.५५ लाख शेतकरी प्रतीक्षेत
राज्यात १ मार्चपासून हरभरा खरेदी नोंदणी सुरू झाली आणि ३ मार्चपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली.
९ एप्रिलपर्यंत १,३३,५६८ शेतकऱ्यांकडून सुमारे ६.९७ लाख क्विंटल हरभरा खरेदी
मात्र अजूनही १,५५,०४८ शेतकरी विक्रीच्या प्रतीक्षेत
आता केवळ २० दिवसांत उर्वरित खरेदी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
बीड-धाराशिवमध्ये सर्वाधिक केंद्रे
राज्यातील २६ जिल्ह्यांत हमीभाव खरेदी सुरू असून
बीड : ४२ केंद्रे
धाराशिव : ३१ केंद्रे
तरीही बारदान्याअभावी अनेक केंद्रांवर खरेदी ठप्प आहे.
शेतकऱ्यांना दुहेरी फटका
हमीभाव : ५,८७० रुपये प्रति क्विंटल
पण बाजारात कमी दराने विक्री करावी लागत आहे
वाहतूक खर्च आणि वेळेचा तोटा वेगळाच
नोंदणी करूनही खरेदी न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
प्रशासनाची धावपळ; तोडगा अद्याप नाही
७ एप्रिल रोजी संबंधित मंत्र्यांसोबत बैठक झाली, मात्र बारदाना पुरवठ्याबाबत ठोस तोडगा निघालेला नाही. केंद्रप्रमुखांच्या मते, एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना माल आणण्याचे आवाहन करण्यात आले; परंतु बारदाना नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे, त्यामुळे अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड बसत आहे.
राज्यातील हमीभाव केंद्रांची स्थिती
नाफेड व एनसीसीएफमार्फत मंजूर केंद्रे : २८२
सक्रिय केंद्रे : ८९३
नोंदणीकृत शेतकरी : २,८८,६१५
बारदान्याच्या तुटवड्यामुळे हमीभाव खरेदीची यंत्रणा ठप्प झाली असून, शेतकऱ्यांसाठी ही मोठी आर्थिक अडचण ठरत आहे. उर्वरित खरेदी वेळेत पूर्ण होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पणनमंत्र्यांचा नेमका निर्णय काय?
राज्यात हरभरा खरेदीसाठी लागणाऱ्या बारदाना (गोणपाट) खरेदीचे अधिकार पूर्वी मार्केटिंग फेडरेशनकडे (Maharashtra State Cooperative Marketing Federation) होते. मात्र, पणनमंत्र्यांनी हे अधिकार स्वतः कडे (पणन विभागाकडे) केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा सविस्तर : Harbhara Kharedi : खरेदी केंद्र बंद का? ‘या’ कारणामुळे हरभरा अडकला
अधिक वाचा : Soybean Kharedi : सरकारने खरेदी केलीच नाही? सोयाबीन उत्पादकांचे कोट्यवधी गेले पाण्यात!
