नाशिक : मागील काही दिवस वातावरणातील बदल (Climate Change) आणि त्यानंतर दोन तीन दिवसांपासून कमी झालेली थंडी पुन्हा परतली आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष पिकांना धोका (Cold Weather) निर्माण झाला असल्याने द्राक्ष बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. ऐन मणी फुगवणीच्या कालावधीमध्ये वातावरणातील बदलाचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.
कडाक्याच्या थंडीचे वातावरण (Temperature) गहू, हरभरा व इतर रब्बीच्या पिकांसाठी फायदेशीर असले तरी द्राक्षाच्या पिकांना मात्र हे वातावरण घातक ठरणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक खर्चही वाढत आहे. द्राक्ष पंढरी (Grape Farming) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा निसर्गाच्या बदलत्या रूपांमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
वाढत्या थंडीमुळे...
- वाढत्या थंडीमुळे व सकाळी सायंकाळी पडणाऱ्या दवबिंदूमुळे द्राक्षाच्या घडांवर बर्निंगची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहे.
- भल्या पहाटेपासून धुके पडत आहे. त्यामुळे बागायतदारांची सकाळ बागेत औषध फवारणी, द्राक्ष वेली हलवून देण्यात उजाडत आहे.
- वातावरणातील सततच्या बदलामुळे द्राक्ष मण्यांची फुगवण कमी होत आहे.
- धुके, पानांवर दवबिंदू जास्त काळ टिकून राहिल्यास पाने जास्त काळ ओली राहतात. त्यामुळे आर्द्रतासुद्धा वाढते.
- या काळात डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचे बीजाणू सक्रिय होतात.
- पाणी उतरत असलेल्या परिस्थितीत सुद्धा याचा प्रादुर्भाव दिसून येईल.
- अशा वातावरणात भुरी आणि डाऊनी या दोन्ही रोगांचे नियंत्रण गरजेचे असेल.
- ज्या बागेत पाने जास्त वेळ ओली राहतात, तेथे स्पर्शजन्य बुरशीनाशकांची धुरळणी करणे फायद्याचे असेल.
- यामुळे ओल्या पानांवर जास्त वेळ बुरशीनाशक चिकटून राहील व रोग नियंत्रण सोपे होईल.
- कॅनॉपीत वाढलेल्या आर्द्रतेत पाने जास्त काळ ओली नसलेल्या परिस्थितीत जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माच्या तीन-चार फवारण्या करून घेतल्यास प्रभावी रोग नियंत्रण होईल.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार?
सततच्या बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. निसर्गातील सततच्या बदलामुळे सकाळी थंडी, धुके, दुपारी उन्हाचा कडाका, थंड वाहणारे वारे, रात्रीचा गारवा यामुळे बागायतदारांचा पूर्ण दिवस शेतातच राबण्यात जात आहे. वातावरणातील बदलामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.