नाशिक : द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) आता बेदाणे निर्मितीला (Bedana Production) वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी समृद्ध होत असून, तळेगाव (ता. दिंडोरी) येथे बेदाण्याचे उत्पादन यशस्वीपणे घेण्यात आले आहे. तीन वर्षांपूर्वी ट्रायल प्लांट म्हणून २० आर. क्षेत्रावर बेदाण्याची यशस्वी लागवड (Grape Framing) करण्यात आली होती. त्यामुळे आता भारतीयांना अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या बेदाण्यापेक्षा उच्च प्रतीचे बी व गोडवा असलेल्या सुगंधी काळे बेदाण्याची चव चाखायला मिळेल.
द्राक्ष बागायतदार संघाने एक वर्षात १,६०० किलो द्राक्षाच्या उत्पादनापासून ५०० किलो उच्च प्रतीचा बेदाणा तयार केला. त्यातील द्राक्षामध्ये साखरेचे प्रमाण २५ ते २७ टक्के आढळले. आगरकर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेने सुगंध (आरोमा) असलेला एच ५१६ ही बी असलेली काळ्या रंगाची व्हरायटी तयार करून महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या तळेगाव (ता. दिंडोरी) येथील फार्मवर तीन वर्षांपूर्वी यशस्वी लागवड केली. हा प्रयोग यशस्वी झाला. बेदाणा प्लॉटला नॅशनल अॅग्रिकल्चर बोर्डाचे डायरेक्टर माणिकराव पाटील, तुकाराम बोराडे, भूषण धनवटे, द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक सोपानराव बोराडे यांनी भेट दिली.
द्राक्ष बागायतदार भरमसाठ उत्पादन खर्चामुळे व भावातील चढ-उतारामुळे अडचणीत आला आहे. त्यामुळेच द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून नैसर्गिक कमी उत्पादन खर्च असलेल्या वाणाची यशस्वी चाचणी घेत आहोत. शेतकऱ्यांना दाक्ष शेतीतून चांगला आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत.
- कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दाक्ष बागायतदार संघ
साडेतीन कि. द्राक्षांपासून किलोभर बेदाणा
सुगंधी आरोमा काळे द्राक्ष एच- ५१६ वाणाच्या साडेतीन किलो द्राक्षापासून एक किलो बेदाणा बनतो. होलसेल ३०५ रुपये किलोने विकला जातो. एकरी १० ते १२ टनाचे उत्पादन होते. त्यापासून तीन ते साडेतीन टन बेदाणा बनतो. खर्च वजा जाता ४ ते ५ लाखाचे उत्पन्न मिळते.
५५० कोटी रुपयांचे परकीय चलन
सद्यस्थितीत आपण नाशिक, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून २ लाख ५१ हजार टन हिरवा व पिवळा बेदाणा कंटेनरद्वारे एक्सपोर्ट करून त्यापासून ५५० कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला प्राप्त करून घेतो. भविष्यात गुलाबी रंगाची द्राक्ष व्हरायटीही फायद्याची ठरणार आहे.