माणिक डेरे
कारखेडा गावातील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने दाखवून दिलं की, योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्नांनी महिलाही यशस्वी उद्योजक होऊ शकतात. (Goat Farming)
ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी सामूहिक शेळीपालन सुरू करून केवळ काही महिन्यांत २१ हजार रुपयांचा नफा मिळवत आर्थिक स्वावलंबनाकडे ठाम वाटचाल सुरू केली आहे. त्यांची ही कहाणी आता इतर महिला गटांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य, ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि पंचायत समिती मानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली या गटाने “सामूहिक शेळीपालन प्रकल्प” सुरू केला.
सुरुवातीला महिलांनी व्यवसायाचे बारकावे समजून घेण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक पवन आडे यांची भेट घेतली. त्यांनी एकात्मिक शेती विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली आणि महिलांना योग्य नियोजनाचे महत्त्व पटवून दिले.
यानंतर गटाने प्रभाग संघात अर्ज मंजूर करून ३.५ लाख रुपये कर्ज स्वरूपात मिळवले. या निधीतून महिलांनी शेड बांधकाम, १७ शेळ्यांची खरेदी आणि आवश्यक साहित्य विकत घेतले. अत्यल्प कालावधीतच फक्त तीन महिन्यांत त्यांनी मेहनतीच्या जोरावर ५ शेळ्या ५२ हजार रुपयांना विकल्या आणि सुमारे २१ हजार रुपये नफा मिळवला.
या यशामुळे गटातील महिलांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांनी पुढेही व्यवसाय वाढवण्याचा संकल्प केला आहे. या प्रकल्पामुळे गावात रोजगारनिर्मिती झाली आहे आणि महिला आता आर्थिक निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेत आहेत.
यशाची गुरुकिल्ली
* सामूहिक प्रयत्न आणि एकजूट
* योग्य मार्गदर्शन आणि नियोजन
* बचत गटाची आर्थिक जबाबदारी
*स्थानिक बाजारपेठेचा लाभ
नव्या वाटचालीकडे प्रवास सुरू झाला
आज या महिलांचा प्रवास फक्त शेळीपालनापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांनी नव्या प्रकल्पांची आखणी सुरू केली आहे आणि ग्रामविकास विभागाच्या सहकार्याने स्वयंपूर्ण महिला उद्योजक होण्याचे ध्येय ठेवले आहे.
शेळीपालन हा आर्थिकदृष्ट्या लाभदायक व्यवसाय ठरत आहे. कारखेडा येथील हा खरेदी-विक्री संघ आता तालुक्यातील इतर महिला स्वयं सहायता गटांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. - पवन आडे, तालुका अभियान व्यवस्थापक