गोंदिया : ऋतूमानानुसार आरोग्याकरिता आवश्यक फळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. थंडीच्या दिवसांत बाजारात पेरू सहज मिळतात. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट, जीवनसत्त्व-सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.
दररोज पेरू खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी, हृदयाचे आरोग्य, पचनसंस्था सुधारण्यास आणि वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे हिवाळ्यात पेरू खाण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम
वजन कमी करायचे असेल तर पेरू हे उत्तम फळ आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते. पेरू खाल्ल्याने पोट बराचवेळ भरलेले राहते. पेरूमध्ये ८० टक्के पाणी असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्याकरिताही पेरू खावेत. दररोज पेरू खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. दिवसभर भूक लागत नसेल तर भाजलेला पेरू खाण्यास सुरुवात करावी. भाजलेला पेरू खाल्ल्याने शरीरात ऊर्जा वाढते.
मधुमेहावर उपाय
पेरू रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. पेरूच्या पानांचा अर्क रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो. जेवल्यानंतर पेरूच्या पानांचा चहा घेतल्याने साखर नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी पेरू खाणे फायदेशीर ठरते.
संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन-सी
विज्ञान असेही मानते की पेरूमध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त व्हिटॅमिन-सी असते. त्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या व्हायरल आजारांपासून संरक्षण मिळते. पेरूमध्ये कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी असते. जीवनसत्त्व, मिनरल्स यांनी समृद्ध असलेले पेरू खाल्ल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळतात. रक्तातील साखरेचे प्रमाणही योग्य तेवढेच राहते व लठ्ठपणा कमी होतो.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर परिणामकारक
हिवाळ्यात अनेकांना कफाचा त्रास होतो. अशावेळी तुम्ही भाजलेला पेरू खायला हवा. भाजलेल्या पेरूने कफ पातळ होतो आणि बाहेर पडण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भाजलेला पेरू खावा, पेरूच्या सेवनाने कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून शरीराचे संरक्षण होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर भाजलेल्या पेरूचे सेवन करणे फायद्याचे ठरते. भाजलेल्या पेरूमुळे मलनि:स्सारण सुरळीत होते.
पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखी खनिजे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असतात. पेरूची पाने व्हिटॅमिन-सी आणि लोहाचा उत्तम स्रोत आहेत. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी पेरू प्रभावी ठरतो.
- डॉ. अपर्णा खोब्रागडे, आयुर्वेदाचार्य
