नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याने गव्हाच्या पिकावर माव्याचा (अळी/कीड) प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. ढगाळ हवामान, आर्द्रता आणि थंडी यामुळे मावा वेगाने पसरत असल्याने शेतकरी सतर्क झाले आहेत. अनेक शेतकरी गव्हावर रोगप्रतिबंधक व कीटकनाशक फवारणी करताना दिसून येत आहेत.
कळवण तालुक्यातील पिळकोस व परिसरात यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी गहू पिकाला अधिक प्राधान्य दिल्याने अनेक शेतशिवारांमध्ये गव्हाची हिरवळ नजरेत भरत आहे. पावसाचे समाधानकारक प्रमाण, उपलब्ध ओलावा आणि बाजारभावाबाबतची अपेक्षा यामुळे गहू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे.
पिकाची वाढ खुंटणार
माव्याच्या प्रादुर्भावामुळे गव्हाच्या पानांवरील रस शोषला जात असून, त्यामुळे पिकाची वाढ खुंटण्याचा धोका निर्माण होतो. याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्य औषधांची निवड करून वेळेवर फवारणी करण्यावर शेतकरी भर देत आहेत.
कृषी तज्ज्ञांचा सल्ला
दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पिकावर नियमित निरीक्षण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेतच उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येते, असेही त्यांनी सांगितले. यंदा गव्हाचा पेरा वाढल्याने अपेक्षित उत्पादन मिळावे, यासाठी शेतकरी मेहनत घेत असून, हवामान अनुकूल राहावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
