गोंदिया : यंदा खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात अक्काळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कृषी व महसूल विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ४९ हजार १६४ हेक्टरमधील धानपिकांचे नुकसान झाले होते, तर १ लाख ३२ हजार ८४४ बाधित झाले असून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे ७८ कोटी १३ लाख ५९ हजार ६६७५ रुपयांची मागणी केली होती. हा निधी शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला उपलब्ध करून दिला असून तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वळता करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. यंदा खरीप हंगामात १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानपिकाची लागवड करण्यात आली होती. धानपिकांसाठी अनुकूल वातावरण असल्याने धानाचे पीकसुद्धा चांगले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने सलग आठ दिवस हजेरी लावली. यानंतर कृषी विभागाने नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केला आहे. तालुका
यात जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील एकूण ४९ हजार ११६ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याने १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ७८ कोटी १३ लाख ५९ हजार ६६५ रुपयांची मागणी शासनाकडे केली होती. यानंतर शासनाने नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाला हा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार निधी
नुकसान भरपाईसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून तहसील कार्यालयांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात हा निधी जमा केला जाणार असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
