Food Processing : परभणीच्या मातीतून उगम पावली ग्रामीण उद्योजकतेची नवी क्रांती. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि युवक आता होत आहेत स्वतः चे मालक. २३३ नवउद्योजक घडविणाऱ्या या योजनेने 'आत्मनिर्भर भारत'ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.(Food Processing)
देशभरात महाराष्ट्र कृषी दिन मंगळवारी साजरा होत असताना परभणी जिल्ह्यात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी चित्र समोर आले आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्योजकतेला बळ मिळाले असून, २३३ नवउद्योजक घडविण्यात कृषी विभागाला यश आले आहे.(Food Processing)
स्वयंपूर्णतेकडे पाऊल
आजच्या युगात अन्न प्रक्रिया उद्योग हे केवळ व्यवसायाचे साधन न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सशक्तीकरणाचे प्रभावी माध्यम ठरू लागले आहे. परभणीतही हीच प्रक्रिया राबविली जात असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्थैर्य या घटकांवर भर देण्यात येत आहे.
३५ टक्के अनुदान व ५०% ब्रँडिंगसाठी सहाय्य
योजनेचा सर्वात मोठा लाभ म्हणजे वैयक्तिक उद्योजकांना त्यांच्या प्रकल्पाच्या एक तृतीयांश (३५%) इतके थेट अनुदान मिळते. याशिवाय बाजारपेठ विकास व ब्रँडिंगसाठी ५० टक्के अनुदान दिले जाते. परिणामी, स्थानिक उत्पादनांना दर्जात्मक सुधारणा करता येते आणि राष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळवता येते.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप
महिला स्वयंसहायता गटांसाठीही ही योजना मोठा आधार ठरली आहे. प्रत्येक गट सदस्याला ४० हजार रुपये बीज भांडवल व उपकरणांसाठी मिळतात आणि गटाला एकूण कमाल ४ लाख रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यामुळे ग्रामीण महिलांमध्ये लघुउद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.
मार्गदर्शन व सुलभ प्रक्रिया
लाभार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर संसाधन व्यक्तींचे पॅनल तयार करण्यात आले असून, हे तज्ज्ञ प्रकल्प अहवाल, बँक कर्ज मंजुरी व परवानग्या मिळवण्यासाठी मार्गदर्शन करतात. यामुळे नवउद्योजकांना अडचणीशिवाय प्रकल्प सुरु करता येतो.
२५ पेक्षा जास्त प्रक्रिया उद्योग प्रत्यक्षात कार्यरत
जिल्ह्यातील २३३ उद्योजकांना एकूण १४ कोटी ६६ लाख ८४ हजार ७८२ रुपये कर्जरूपाने देण्यात आले असून, यामध्ये २५ हून अधिक अन्न प्रक्रिया उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत.
शेती उत्पादनांचे मूल्यवर्धन, उत्पादनावर आधारित नवउत्पादने आणि स्थानीय रोजगारनिर्मिती ही या योजनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
एक मजबूत ग्रामीण भारत घडविण्याची दिशा
परभणी जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या या नवउद्योजकांच्या यशोगाथा हेच दर्शवतात की योग्य मार्गदर्शन, शासकीय मदत व जिद्द या त्रिसूत्रीच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण युवक-युवती स्वयंपूर्णतेच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करू शकतात.