Fog Effect on Crops : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेस पडणाऱ्या दाट धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिके गंभीर धोक्यात आली आहेत. (Fog Effect on Crops)
वाडेगावसह नकाशी, देगाव, तामसी चिंचोली, धनेगाव, पिंपळगाव, बल्लाडी, दिग्रस बु., दिग्रस खुर्द, हिंगणा, तुलंगा बु., तुलंगा खुर्द, तांदळी बु., तांदळी खुर्द, बेलुरा बु., बेलुरा खुर्द, सस्ती, लावखेड आदी गावांमध्ये पहाटे दाट धुक्याची चादर पसरत आहे. (Fog Effect on Crops)
याचा थेट परिणाम हरभरा, गहू, कांदा रोपे, तूर, भाजीपाला तसेच फळबागांवर होत असून शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.(Fog Effect on Crops)
पिकांवर विपरीत परिणाम
धुक्यामुळे पिकांच्या पानांवर दीर्घकाळ ओलावा साचून राहतो. त्यामुळे बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण तयार होत आहे.
हरभरा, तूर, कांदा, मिरची, टोमॅटो, गहू या पिकांवर करपा, पानांवरील डाग, भुरी, मर रोग तसेच सड रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.
काही ठिकाणी कांद्याच्या रोपांची पाने सुकत असून हरभरा व कडधान्य पिकांची वाढ खुंटण्याची भीती आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
कांदा पिकासाठी मोठ्या प्रमाणावर रोपे लावण्यात आली आहेत. मात्र, धुक्यामुळे होणाऱ्या धुवारीमुळे ही रोपे जळण्याच्या मार्गावर असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कांद्याबरोबरच हरभरा व तूर पिकांनाही धुके पोषक नसल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
हिंगोली जिल्ह्यातही धुक्याचा फटका
हिंगोली जिल्ह्यात ६ जानेवारी रोजी सर्वत्र दाट धुके पडले. गहू व हरभरा ही पिके सध्या फलधारणेच्या अवस्थेत असून वाढलेल्या आर्द्रतेचा थेट परिणाम या पिकांच्या वाढीवर होत आहे.
काही दिवसांपासून सकाळी धुके टिकून राहत असल्याने गहू पिकावर करपा, तांबेरा, मावा तसेच इतर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला आहे. हरभऱ्यावर पाने पिवळी पडणे व मर रोगाची लक्षणे दिसू लागली आहेत.
औषध फवारणीचा वाढता खर्च
पिके वाचवण्यासाठी शेतकरी कृषी विभागाच्या सल्ल्याने वारंवार औषध फवारणी करत आहेत. कीटकनाशके व बुरशीनाशकांवर होणारा खर्च वाढल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत.
ढगाळ वातावरणामुळे औषधांचा अपेक्षित परिणाम होत नसल्याची तक्रारही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
ढगाळ वातावरणामुळे चिंता
औंढा नागनाथ तालुक्यात खरीप हंगाम अतिवृष्टीने हातचा गेल्यानंतर मोठ्या आशेने रब्बी हंगामाचा पेरा करण्यात आला आहे. ज्वारी, गहू, हरभरा सध्या चांगल्या अवस्थेत असतानाच गेल्या पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भावही काही ठिकाणी दिसून येत आहे. तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहून मार्गदर्शनासाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
केळी पिकालाही फटका
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ, रेडगाव, वडगाव, वसफळ, गुंडलवाडी, सालापूर, डिग्रस, हिवरा आदी भागात केळीच्या पिकांवरही धुक्याचा मोठा परिणाम झाला आहे.
तापमान ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने केळीची पाने पिवळी पडणे, करपा, पोंगा उलटे पडणे आणि निसवण उशिरा होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.
आधीच बाजारभावात मोठी घसरण झालेली असताना आता रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने केळी उत्पादक शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
* शेतात अतिरिक्त पाणी साचू देऊ नये.
* गरज नसताना पाणी देणे टाळावे.
* धुके कमी झाल्यानंतरच तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी.
* रोगग्रस्त पाने व रोपे वेळीच काढून नष्ट करावीत.
* पिकांची नियमित पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच उपाययोजना कराव्यात.
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची मागणी
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी विभागाने तातडीने शेतशिवाराची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तांत्रिक मार्गदर्शन करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
वेळेवर सल्ला व उपाययोजना मिळाल्यास पिकांचे होणारे नुकसान काही प्रमाणात तरी टाळता येईल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
