मुंबई : जर तुम्हालाही घरबसल्या छोटा मोठा व्यवसाय करायचा असल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना फायदेशीर ठरणार आहे. या योजनेतून जवळपास एक लाख रुपयांपासून ते २५ लाखपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. आता या योजनेसाठी ३ कोटी रुपयांचा निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.
काय आहे हि योजना
राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे प्रारंभीक टप्प्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवली जाते. होतकरू महिलांच्या स्टार्टअप्सना पाठबळ देणे, त्यांना व्यवसाय थाटण्यास मदत करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
काय आहे पात्रता
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) मान्यताप्राप्त महाराष्ट्रातील स्टार्टअप असावेत.
महिला संस्थापक यांचा किमान ५१ टक्के वाटा असावा,कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत ३० जून २०२३ पूर्वीची नोंदणी आवश्यक.
वार्षिक उलाढाल १० लाख ते १ कोटी पर्यंत असावी.
आश्वासक, नाविन्यपूर्ण, प्रभावी व रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य, राज्य शासनाच्या इतर योजनेतील अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा हे या योजनेचे पात्रता निकष आहेत.
यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
स्टार्टअपना सक्षम करणे
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता स्टार्टअप धोरणांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मीती करून नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्टार्टअपना सक्षम करणे, इत्यादी उदिष्टये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकाकरीता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी सबंधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात.
Read More : गुंठेवारी म्हणजे काय, गुंठेवारी प्लॉटवर घर बांधता येत का? जाणून घ्या सविस्तर
