जयेश निरपळ
यंदा झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेती उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७.८१ इतकी जाहीर करण्यात आली आहे. (Final Annewari)
जिल्हाधिकारी कार्यालयाने सोमवारी (१५ डिसेंबर) रोजी ही अंतिम पैसेवारी जाहीर केल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची दुष्काळी स्थिती अधिकृतरीत्या स्पष्ट झाली आहे. (Final Annewari)
पैसेवारी ५० पैशांच्या आत आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी शासकीय मदतीसाठी पात्र ठरणार असून, अतिवृष्टीग्रस्त बळीराजाला यामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. (Final Annewari)
अतिवृष्टीने पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी
जिल्ह्याचे एकूण लागवडीखालील क्षेत्र ७ लाख ९९ हजार ४४७ हेक्टर असून, यापैकी ७ लाख ४९ हजार ८०३ हेक्टरवर पेरणी झाली होती. मात्र, ६२ हजार ५२३ हेक्टर क्षेत्र पडीक राहिले. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला.
मे महिन्याच्या अखेरीस सलग १५ दिवस पाऊस, त्यानंतर संपूर्ण पावसाळ्यात सातत्याने झालेली अतिवृष्टी, तसेच पावसाळा संपल्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले.
नदीकाठची शेती १०० टक्के बाधित
नदी व नाल्यांच्या पुरामुळे नदीकाठची शेती १०० टक्के नुकसानग्रस्त झाली. ज्या नद्यांवर बंधारे आहेत, तेथे बॅकवॉटरमुळे दोन ते तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर पाण्याखाली गेला. त्यामुळे शेती उत्पादनात मोठी घट झाली असून, याचा थेट परिणाम पैसेवारीवर झाला आहे. परिणामी, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० च्या खाली आली आहे.
खरीप पिकांसह फळबागांनाही फटका
यंदा अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका खरीप पिकांना बसला. कापूस, सोयाबीन, मका, उडीद, मूग, ज्वारी यांसह फळबागांनाही ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मोठे नुकसान झाले.
ऑक्टोबरमध्येही पावसाने थैमान घातल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. विशेषतः कपाशी व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पैसेवारी कशी ठरते?
महसूल विभागामार्फत दरवर्षी कोरडवाहू खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढली जाते. तहसीलदारांनी स्थापन केलेल्या ग्रामपीक समित्यांनी सादर केलेल्या अहवालांवर आधारित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार १५ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७.८१ जाहीर करण्यात आली.
२९ गावांची पैसेवारी जाहीर नाही
जिल्ह्यात एकूण १,३८५ गावे असून, त्यापैकी १,२२४ खरीप तर १६१ रब्बी गावे आहेत. खरीप व रब्बी मिळून १,३५६ गावांची पैसेवारी काढण्यात आली, मात्र उर्वरित २९ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १९ गावे मनपा हद्दीत,
पैठण तालुक्यातील ६ गावे आणि गंगापूर तालुक्यातील २ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित,
फुलंब्री तालुक्यातील २ गावे बेचिराख म्हणून नोंदवली असल्याने या गावांची पैसेवारी काढण्यात आली नाही.
तालुकानिहाय अंतिम पैसेवारी
| तालुका | पैसेवारी |
|---|---|
| छत्रपती संभाजीनगर | ४६.७ |
| पैठण | ४६.११ |
| फुलंब्री | ४९ |
| वैजापूर | ४७.७३ |
| गंगापूर | ४८.१५ |
| खुलताबाद | ४८ |
| सिल्लोड | ४८ |
| कन्नड | ४८ |
| सोयगाव | ४८ |
| एकूण जिल्हा | ४७.८१ |
शासकीय सवलतींची अपेक्षा
पैसेवारी ५० च्या आत आल्याने जिल्ह्यात टंचाई निकष लागू होणार असून,
* पीक नुकसान भरपाई
* महसूल सवलती
* कर्ज पुनर्रचना
विविध शासकीय मदत योजनांमध्ये प्राधान्य मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करत आहे. आता सरकारकडून तातडीने मदतीची घोषणा होण्याकडे जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.
