चंद्रपूर :शेतकरी बांधवांसाठी दिलासा ठरणारी 'वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना' आता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुरू केली जाणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त ११ ऑक्टोबर रोजी या योजनेचा शुभारंभ होणार असून, सहकार क्षेत्रातील राज्यातील हा पहिलाच सामाजिक प्रयोग ठरणार आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
ही योजना चंद्रपूर जिल्हा बँकेच्या संलग्न सेवा सहकारी संस्था, वि. का. संस्था, आदिवासी वि. का. संस्था यांचे नियमित कर्जफेड करणारे किंवा चालू कर्जदार सभासद यांच्यासाठी आहे.
लाभ फक्त अर्जदार शेतकरी कर्जदार कुटुंबातील सदस्यांनाच (आई, वडील, पती, पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी, मृत मुलाचा मुलगा/मुलगी, विधवा सून) मिळणार आहे. हिंदू वारसा कायदा ७५ (२) देखील लागू राहणार आहे.
आर्थिक मदत कशी मिळेल ?
उपचार, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाच्या ३० टक्के किंवा जास्तीत जास्त ४० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत बँकेमार्फत दिली जाणार आहे.
मदतीचा लाभ; उपचार व शस्त्रक्रियेसाठी कर्करोग, हृदयविकार, मेंदूसंबंधी आजार, अपघात (वाहन, झाडावरून पडणे, वीज पडणे, साप वा वन्यप्राण्यांचा हल्ला), याशिवाय इतर आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया.