नाशिक : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसर हा स्ट्राॅबेरी उत्पादनात अग्रेसर असून, सुरगाणा तालुक्यातही उत्पादन वाढत आहे. लाल रंगाची, गोड, आंबट चवीच्या या फळांचा हंगाम वाढत्या थंडीबरोबरच बहरला आहे. लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वळत आहेत. या आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या उत्पादनाने उत्पन्नाचा नवा स्त्रोत उपलब्ध झाल्याने त्यामुळे येथून रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी झालेले दिसून येत आहे.
घाटमाथ्यावर पंचवीस वर्षांपूर्वी भात, नागली, वरई, मका, भुईमूग, कुळीद, उडीद, खुरासणी, ज्वारी, गहू ही पारंपरिक पिके घेतली जात होती. या पिकांसह आता शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करून या शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पूर्वी खरीप हंगाम संपला की रोजगाराच्या शोधार्थ होणारे आदिवासी कुटुंबाचे स्थलांतर कमी झाले आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी घोडांबे येथील श्रीराम गायकवाड यांनी आपल्या शेतात तसेच बोरगाव येथील वीज वाहक शिवाजी कर्डिले यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी शिंदे दिगर येथे शेती बटाईने घेऊन महाबळेश्वर येथून स्ट्राॅबेरीची रोपे आणून लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. त्यानंतर या भागात स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी आवश्यक पोषक वातावरण, हवामान, जमिनीचा पोत असल्यामुळे या भागातील शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले. बोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा स्ट्राॅबेरी पिकाकडे कल दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यात १७५ पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे.
स्ट्रॉबेरी या पिकापासून एकरी दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न होत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळला आहे. स्ट्रॉबेरीचे वाण विंटर डाऊन, सेल्व्हा, राणी, इंटर डाऊन, नाभिया, स्वीट चार्ली, एसए, कामारोजा, इंटरप्लस, चांडलर, स्वीट गोल्ड यांसह कमी दिवसांत लालभडक मोठे फळ देणाऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. या वाणांची रोपे येथील आदिवासी शेतकरी प्रामुख्याने महाबळेश्वर येथून आणतात. स्ट्रॉबेरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला आहे. त्यामुळे घाटमाथा परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या हाताला आपल्याच शेतीत काम मिळाल्याने स्थलांतर थांबले आहे.
शेतकरी एक ते दोन किलोचे खोके भरून मुंबई, सुरत, नवसारी, बिल्लीमोरा, अहमदाबाद, पुणे, छत्रपती संभाजीनगर, वघई, भरूच, वाझदा, बडोदा, वलसाड, धरमपूर, नानापोंडा येथे पाठवतात. त्यांना सध्या प्रतिकिलो दीडशे ते दोनशे रुपये भाव मिळत आहे. काही शेतकरी जागेवरच परिसरातील व्यावसायिकांना स्ट्रॉबेरीची विक्री करतात. बहुतांश शेतकरी हे वणी, नाशिक, नांदुरी, सप्तशृंगीगड, सापुतारा रस्त्यावरही ठिकठिकाणी छोटे स्टॉल उभारून विक्री करताना दिसून येतात. स्ट्रॉबेरी विक्रीतून अनेकांना यापासून रोजगार उपलब्ध झाला आहे.
बहुगुणी फळ
स्ट्राॅबेरीचे फळ हे आरोग्यदायी असून, यापासून वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर तयार करण्यात येतात. या फळात ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. शरीराच्या त्वचेची कांती उजळते, वजन नियंत्रणात राहते, कॅल्शिअम, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते, केस गळतीचे प्रमाण कमी होते, मधुमेह असणाऱ्यांमध्ये साखरेचे नियंत्रण होते. यासह विविध गुणधर्म या फळामध्ये आढळून येतात. सध्या बोरगाव परिसरातील स्ट्राॅबेरीला महाबळेश्वर येथेही मागणी असून, हे फळ बंगळुरू, पुणे, सातारा, सांगली, गोवा या ठिकाणी पाठवले जात आहे.
सुरगाणा तालक्यातून जाणाऱ्या गुजरात राज्यातील पर्यटकांकडूनही मोठी मागणी असते.
बोरगाव परिसरात पूर्वी केवळ खरीप हंगामात शेती पावसावर अवलंबून होत होती. स्ट्राॅबेरी या पिकापासून एकरी उत्पादन चांगले मिळत असल्याने या भागातील शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. या पिकामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतातच काम मिळाल्याने स्थलांतर थांबले आहे.
- अशोक भोये, स्ट्राॅबेरी उत्पादक, घोडांबे
