शंकर खराटे
शेतात केळीचे रोप लावताना दीपक शिवाजीराव बुढाळ यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या मेहनतीचा सुगंध इराणपर्यंत पोहोचला. पारंपरिक शेतीसोबत नवे प्रयोग करण्याची वृत्ती, दर्जेदार उत्पादनावर भर आणि निर्यातक्षम शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या त्रिसूत्रीच्या जोरावर सावळदबार या छोट्या गावाचे नाव आज आंतरराष्ट्रीय बाजारात झळकत आहे. (Farmer Success Story)
बदलत्या बाजारात नव्या संधीचा शोध
बुढाळ यांनी या हंगामात सुमारे ५ हजार केळीची झाडे लावली. मात्र, फळ तयार होताच बाजारात केळीचे दर ३८० रु. प्रतिक्विंटलपर्यंत घसरले.
खर्चही निघेल की नाही, या चिंतेत असतानाच त्यांचे उत्पादन निर्यातदारांच्या नजरेत आले. दर्जेदार व एकसमान फळ गुणवत्तेमुळे थेट इराणला केळी निर्यात करण्याचा करार झाला.
२६ टन केळींचा पराक्रम!
सावळदबारातून वाशीमार्गे मुंबईपर्यंत केळी पोहोचवण्यात आली आणि तिथून ती थेट इराणकडे रवाना झाली. आतापर्यंत २६ टन केळींची निर्यात झाली असून दीपक बुढाळ यांना प्रतिक्विंटल ८०० रुपये दर मिळाला जो स्थानिक बाजारापेक्षा दुप्पट आहे.
साठवण तलावाचा लाभ
गावातील साठवण तलावामुळे वर्षभर पाण्याचा पुरवठा उपलब्ध झाला आणि त्यामुळे केळी लागवड शक्य झाली. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनामुळे उत्पादनही उत्कृष्ट झाले.
मेहनतीची फळं
मर्यादित साधनांतून मुलांनी दर्जेदार केळी तयार केली आणि ती निर्यातीसाठी पोहोचवली. हे केवळ आमच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण गावाचे यश आहे.
शेतकऱ्यांनी परिस्थितीला न जुमानता आपल्या जमिनीचा प्रकार ओळखून नव्या पद्धतींचे प्रयोग करावेत. अशा प्रयत्नांनी शेतीला नवे मार्ग मिळतील.- शिवाजीराव बुढाळ, माजी जि.प. सदस्य
परिस्थिती कितीही कठीण असो, नव्या कल्पना आणि प्रयोगशीलता शेतकऱ्यांना यश देतात.- दीपक बुढाळ, शेतकरी, सावळदबारा.
