संजय खासबागे
संत्र्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड तालुक्यातील सातपुडा परिसरातील जामठी गाव आज सामूहिक रेशीम व मशरूम शेतीच्या प्रयोगामुळे संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. दुर्गम भागात वसलेलं, पण शिक्षण आणि शेतीत पुढारलेलं हे गाव आज 'रेशीमग्राम' म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.(Farmer Success Story)
लहान गाव, पण मोठं स्वप्न!
जेमतेम १३० कुटुंबं आणि सुमारे ८०० लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात आठ एमबीबीएस डॉक्टर, २० अभियंते आणि तब्बल ३५ पदवीधर आहेत.
या सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन 'फार्मर्स प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली आणि सामूहिक शेतीच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू केला.
रेशीम आणि मशरूम शेतीचा यशस्वी प्रयोग
संत्रा, मोसंबी, गहू, मका, तूर आणि भाजीपाला या पारंपरिक पिकांबरोबरच गावातील तरुण शेतकऱ्यांनी रेशीम व मशरूम उत्पादनाचा निर्णय घेतला. त्यासाठी तुतीची लागवड करण्यात आली आणि रेशीम तयार करण्याच्या जागेवर मशरूम उत्पादनाची वेगळी व्यवस्था उभारली.
आज एका एकर शेतीतून सुमारे ३.५ लाखांचे उत्पन्न मिळत असून, हा प्रयोग तालुक्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गावात शिक्षण आणि सहकार यांची जोड
जामठीतील नागरिकांचा एकोपा आणि शिक्षणाकडे असलेला कल उल्लेखनीय आहे. प्रत्येक घरातील मूल शाळेत जाते.
गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जिल्हा परिषदेच्या शाळेची देखभाल केली आहे. शिक्षण आणि शेती यांची जोड देत गावाने स्वावलंबनाचा नवा आदर्श घालून दिला आहे.
दूध उत्पादन आणि दुग्धव्यवसायातूनही उत्पन्न
गावातील नागरिक पारंपरिक दुग्धव्यवसायातही सक्रिय आहेत. दिवसाला सुमारे ८०० लिटर दूध उत्पादन होतं आणि जिल्हाभरात खव्याचा पुरवठा येथून केला जातो.
इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श मार्ग
आज राज्यभरातून शेतकरी जामठीला भेट देऊन रेशीम आणि मशरूम शेतीचा हा यशस्वी प्रयोग पाहत आहेत. सातपुड्याच्या कुशीतलं हे लहानसं गाव आज महाराष्ट्रात 'स्मार्ट शेती, सामूहिक यश' या संकल्पनेचं उत्तम उदाहरण बनलं आहे.
