गोकुळ भवरे
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आंदबोरी (चिंचोली) येथील सुभाष मुंडे या प्रयोगशील शेतकऱ्याने अपयशातही संधी शोधत शेतीत यश मिळवले. आणि चांगला नफा कमवून शेतीत फायदा असते हे सिध्द केले. (Farmer Success Story)
शेती ही निसर्गाशी जोडलेली आणि अनिश्चिततेने भरलेली प्रक्रिया असली, तरी योग्य नियोजन, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे यश मिळवता येते, याचा आदर्श उदाहरण म्हणजे आंदबोरी (चि.) येथील सुभाष मुंडे (Subhash Munde's). (Farmer Success Story)
अपयशानंतरही न खचता त्यांनी घेतलेला तूर पिकाचा प्रयोग यशस्वी ठरला आणि त्यांनी केवळ साडेपाच महिन्यांत १ लाख ३० हजार रुपयांचा नफा मिळवला. त्यांच्या या यशाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना नवी दिशा आणि प्रेरणा दिली आहे. (Farmer Success Story)
खरीप हंगामात त्यांनी जून महिन्यात सोयाबीन पेरले, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात मोठी घट झाली. अनेक शेतकरी अशा वेळी निराश होतात, मात्र सुभाष मुंडेंनी त्या अपयशातून शिकत त्वरित निर्णय घेतला. (Farmer Success Story)
सोयाबीन निघाल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर महिन्यात तात्काळ ३ एकर जमिनीत हिवाळी तुरीचे ४० किलो बियाणे पेरले. नियमित नांगरणी, वखरणी आणि पिकाची योग्य काळजी घेत एप्रिल महिन्यात तब्बल २३ क्विंटल तूर उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांनी ही तूर नाफेडच्या खरेदी केंद्रावर ७ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने विकली. (Farmer Success Story)
या विक्रीतून १ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, त्यांना तूर पिकासाठी एकूण खर्च फक्त ५० हजार रुपये आला होता. यामुळे केवळ साडेपाच महिन्यांत १ लाख ३० हजार रुपयांचा नफा मिळाला. यामुळे सोयाबीनची कसर भरुन काढली. (Farmer Success Story)
यश नक्कीच मिळू शकते
सुभाष मुंडे यांची यशोगाथा ही तालुक्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शेती करताना संकटे येतातच, पण त्या संकटांवर मात करत नवे पर्याय शोधले, तर नक्कीच यश मिळू शकते. हे त्यांनी सिध्द केले आहे.
शेती साथ देतेच
शेती करताना निसर्गाचा फटका बसतो; पण त्यात खचून न जाता अन्य पीक कसे घेता येईल याकडे लक्ष दिले तर शेती साथ देतेच यात तिळमात्र शंका नाही. - सुभाष मुंडे, शेतकरी