Agriculture News :पुणे जिल्ह्यातील राजगड (वेल्हा) हा दुर्गम तालुका. बांबू आणि भात उत्पादनासाठी राजगड तालुक्याची ओळख आहे. पण इथल्या बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी तयार केलेली शिवतोरण बांबू उत्पादक शेतकरी कंपनी यशस्वीपणे वाटचाल करताना दिसत आहे.
केवळ ३ वर्षात ५०० बांबू उत्पादक शेतकरी सभासद आणि ३० लाखांच्या उलाढालीचे लक्ष्य त्यांनी साध्य केले आहे. एवढेच नाही तर, बांबूवर प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेत या कंपनीने चांगले काम केले असून यावर्षी शेतकऱ्यांना बोनसही दिला आहे. शेतकरी सभासदांना बोनस देणाऱ्या खूप कमी कंपन्यांपैकी शिवतोरण बांबू उत्पादक शेतकरी कंपनी असल्याचं संचालक भाऊ गुजर यांनी सांगितले.
मागच्या चार ते पाच वर्षांमध्ये बांबू या पिकाकडे अनेक शेतकरी वळाले आहेत. राजगड तालुक्यातील डोंगरभागामध्ये स्थानिक बांबूचे प्रमाण अधिक आहे. येथील पारंपारिक बांबूवर प्रक्रिया करून या मालाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी अनेक शेतकरी काम करतात. यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत राजगड तालुक्यातील पासली येथे २०२२ साली ही कंपनी स्थापन केली होती.
दरम्यान, ३ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये सध्या ५०० बांबू उत्पादक शेतकरी सभासद असून यावर्षी ३० लाखांची उलाढाल या कंपनीने केली आहे. यासोबतच यंदा दिवाळीत जास्तीत जास्त ६ हजार ते कमीत कमी ५०० रूपये बोनस शेतकरी सभासदांना देण्यात आला आहे. कच्चा माल (बांबू) देणारे शेतकरी, सभासद आणि कार्यक्षम संचालक असे मिळून ८० लोकांना व त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक शेतकऱ्याच्या बिला प्रमाणे व सभासद गुंतवणूक रक्कमेप्रमाने ५% बोनस दिला गेला.
थेट विक्री व्यवस्थेमध्येही काम करणार
राज्यातील जवळपास ९० टक्के शेतकरी उत्पादक कंपन्या बंद अवस्थेत असून या माध्यमातून कोणतीही उलाढाल होताना दिसत नाही. पण जेवढी उलाढाल होईल त्यातूनच शेतकरी सभासदांना बोनस देण्याच्या अभिनव उपक्रमातून अधिकाधिक शेतकरी जोडले जात असून दरवर्षी कंपनीची उलाढाल वाढत जाईल आणि परिणामी त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती शेतकरी सभासदांनी दिली. यासोबतच येणाऱ्या काळात थेट विक्री व्यवस्थेमध्येही काम करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
कंपनीने एक अभिनव उपक्रम राबवला असून मागील ३ वर्षातच हे यश संपादन केले आहे. असा उपक्रम राबवणारी शिवतोरण शेतकरी उत्पादक कंपनी हे राज्यातील पहिल्या १० कंपन्यांतील एक कंपनी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
- भाऊ गुजर (संचालक - शिवतोरण बांबू शेतकरी उत्पादक कंपनी)
