Farmer Accounts Hold : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमा बँकांनी थकबाकीच्या कारणावरून 'होल्ड' करून ठेवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. (Farmer Accounts Hold)
शेतकऱ्यांच्या खात्यांवरील मदत रक्कम अडविणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे. (Farmer Accounts Hold)
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव शेतकरी राजेश उगले यांच्या खात्यात आलेली मदतीची रक्कम बँकेने होल्ड केल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर प्रशासन तत्परतेने हालचालीला लागले. अपर आयुक्त रिता मैत्रेवार यांनी संबंधित बँकांना तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीची रक्कम त्यांच्या खात्यावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
अनुदान वाटपाचा आढावा
अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या हानीपोटी शासनाने ८ हजार ९७६ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
११ नोव्हेंबरपर्यंतच्या अहवालानुसार
७६ लाख ३८ हजार ८८५ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड
त्यापैकी ६६ लाख ५ हजार ८९२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४,९७१ कोटी रुपये जमा
अनुदान वाटपाचे प्रमाण ५५.३९%
एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ९ लाख ८५ हजार ५२ एवढी आहे.
केवायसीमुळे ७ लाख शेतकरी वंचित
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ७ लाख ८४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्यांची फार्मर आयडी (AgriStack) नोंदणी झालेली नाही, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी व अॅग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हानिहाय अनुदान वाटप (कोटी रुपये)
| जिल्हा | बाधित शेतकरी | अनुदान वाटप (कोटी रुपये) |
|---|---|---|
| नांदेड | १०,८९,६७३ | ८८० |
| लातूर | १२,७२,८२३ | ९४३ |
| धाराशिव | १०,४७,४२० | ७०६ |
| हिंगोली | ४,६९,००२ | ६८२ |
| परभणी | ७,७५,५४५ | ५१६ |
| संभाजीनगर | ६,७२,९०९ | ५२५ |
| जालना | ५,०६,७६४ | ३३९ |
| एकूण | ६६,०५,८९२ | ४,९७१ कोटी |
बँकांची हालचाल
गल्लेबोरगावसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांवर बँकांनी मदतीची रक्कम होल्ड केली होती. या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित बँकांनी तत्काळ कारवाई करून सर्व खात्यांवरील होल्ड काढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्यातील मदत रक्कम काढून घेतली. या भागात एकूण २७ हजार ८७२ शेतकरी आणि ३१ हजार ४५० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीसाठी २७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवर कोणत्याही कारणाने कपात करू नये किंवा ती रक्कम थकबाकीपोटी थांबवू नये. शासनादेश डावलणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई केली जाईल.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र काही बँकांच्या मनमानीमुळे मदत वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर आता मदत खात्यात पोहोचली असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
बँक व्यवस्थापक काय सांगतात
आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जासाठी हा होल्ड लावला नव्हता. सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १०१ अंतर्गत काही तांत्रिक कारणामुळे तो लागू झाला होता. प्रशासनाच्या सूचनेनुसार सर्व खाती तपासून होल्ड काढण्यात आला.- धर्मेंद्र हारदे, शाखा व्यवस्थापक, जिल्हा बँक, गल्लेबोरगाव
शेतकऱ्यांना दिलासा
'लोकमत'च्या वृत्तामुळे आमचे खाते सुरू झाले. आम्ही मदतीची रक्कम काढू शकलो. माध्यमांनी वेळेवर आवाज उठवल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.- किरण हारदे, शेतकरी, गल्लेबोरगाव
लोकमतने पुन्हा एकदा जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला.- सचिन भोजने, शेतकरी
