गोंदिया : सध्या रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत छत्तीसगड राज्यातील काही कंपन्यांकडून बनावट कृषी औषध व तणनाशकांचा पुरवठा केला जात आहे. महागडी तणनाशके फवारूनही शेतातील तण नष्ट होत नसल्याने व उलट धानाची वाढ खुंटत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे उघडकीस आला आहे.
उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून, सध्या धान गर्भावस्थेत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांकडून मजुरांची टंचाई आणि वेळ वाचवण्यासाठी तणनाशकांचा पर्याय निवडला जात आहे. मात्र, बाजारात कमी किमतीत उपलब्ध असलेल्या आणि छत्तीसगडमधील काही कंपन्यांच्या तणनाशकांचा वापर केल्यावर कोणताच परिणाम दिसून आता नाही.
गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथील शेतकरी चोकलाल जोगीलाल वाळवे यांनी गावातीलच एका कृषी केंद्रातून पुनी सेट व अलमोक्स नावाचे तणनाशक खरेदी करून शेतात फवारले. मात्र, काही दिवसांतच त्यांना धक्कादायक अनुभव आता. तणाचा नायनाट होण्याऐवजी या औषधामुळे तणाची वाढ होत धानाची वाढ खुंटत असल्याचे दिसून आले.
यावर त्यांनी कृषी केंद्र संचालक व संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले. मात्र, कंपनीच्या प्रतिनिधीकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यांनी गोरेगाव येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
संबंधित कंपनीकडे महाराष्ट्रात पुरवठा करण्याचा परवाना असू शकतो. या कंपनीचा परवाना तपासून व सखोल चौकशी करून निश्चित कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांनी खते, कीटकनाशके खरेदी केल्यानंतर त्याचे पक्के बिल घ्यावे.
- नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया
