Agriculture News : जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद यांचे अध्यक्षतेखाली शासनाने भरारी पथक तयार केले आहेत. सदर भरारी पथकातील सदस्य डॉ जगन सुर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिअकृअ कार्यालय नाशिक यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील हरसुल येथे बनावट खतसाठा (Fake Fertilizer) विक्री साठी हरसुल येथे येणार असल्याचे कळले.
त्यानंतर भरारी पथक प्रमुख संजय शेवाळे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, जगन सुर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिअकृअ नाशिक, कल्याण पाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, रामा दिघे कृषि अधिकारी (गुनि), तालुका कृषि अधिकारी कार्यालय त्र्यंबकेश्वर व पोलिस उपनिरीक्षक मोहित मोरे व इतर पोलिस कर्मचारी यांचे सहाय्याने दिनांक 15 जुलै रोजी हरसुल येथे आयशर पकडण्यात आला.
सदर वाहन पोलिस ठाणे हरसुल येथे नेऊन त्याची तपासणी केल्यानंतर त्यात झुआरी अग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीचे 10.26.26 या खताच्या डुप्लिकेट 240 बॅगा आढळुन आल्या. सदर खताची अंदाजे किंमत 3.30 लाख रुपये इतकी आहे. सदरील वाहन व जप्त करण्यात आलेले खत असा एकूण 15.30 एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर बाबतीत प्राथमिक शहानिशा करून पकडलेल्या खताचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीकरीता पाठविण्यात आला आहे. सदर प्रकरणी हरसुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कामकाजात सुभाष काटकर, विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक व अभिमन्यु काशिद, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शन घेण्यात आले. तसेच घरपोच मिळणारी अनुदानित खते शेतकऱ्यांनी खरेदी करु नये, खतांच्या बॅग खरेदी करताना सिलबंद तसेच त्यावरील माहिती कायद्यानुसार आहे हे पाहून घ्यावे आणि कृषि निविष्ठा या अधिकृत विक्रेत्यांकडुन व पक्कया बिलात पॉस मशीनवरूनच खरेदी करण्याचे आवाहन सुभाष काटकर विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी विभागातील शेतकऱ्यांना केले.