Fake Fertilizers : नागपूरच्या लावा गावात कृषी विभागाच्या भरारी पथकाने बोगस खत व कीटकनाशक निर्मिती करणाऱ्या विनापरवाना कारखान्यावर धाड टाकून तब्बल ५२.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
शासन मान्यता नसलेली जैविक व रासायनिक उत्पादने तयार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या भरारी पथकाने खडगाव रोडवरील लावा गावात विनापरवाना व शासन मान्यता नसलेल्या बोगस जैविक उत्पादने, रासायनिक खते आणि कीटकनाशके निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर गुरुवारी कारवाई केली. या धाडीत एकूण ५२ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारखान्याचा प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार, परेश विजय खंडाईत (३२) हे प्रशांत विठोबाजी बोरकर यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये निम पॉवर, भूशक्ती, ब्लॅक गोल्ड, वरदान गोल्ड, अॅग्रोमॅक्स गोल्ड, सिल्व्हर शाईन अशा विविध नावांनी शासन मान्यता नसलेली उत्पादने तयार व पॅक करत होते. येथे रिकाम्या बाटल्या, पोती, पॅकिंग मशीन, रासायनिक खते, द्रव्य व जैविक खते साठवून त्यांचे उत्पादन व पॅकिंग सुरू होते.
धाडीत जप्त केलेल्या मुद्देमालाचा तपशील
रिकाम्या बाटल्या व पोती
पॅकिंग मशीन
रासायनिक खते
द्रव्यरूप व जैविक खते
असा एकूण ५२ लाख ६१ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व साहित्याचे नमुने खत निरीक्षण प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
कारवाई कशी झाली?
ही धाड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका गुण नियंत्रण निरीक्षक रिना डोंगरे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मार्कड खंडाईत यांच्या पथकाने केली.
गुन्हा दाखल
विना परवाना रासायनिक व जैविक खते उत्पादन, विहित मानके नसलेल्या खतांचे उत्पादन, लेबलवर खोटे किंवा दिशाभूल करणारे तपशील नमूद करणे, आवश्यक अभिलेखांचा अभाव अशा गंभीर आरोपांखाली कारवाई करण्यात आली.
रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ – कलम ७, १९, २८, ३५
अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ – कलम ३(२)(ए), ३(२), ३(२)(डी)
या कलमान्वये परेश विजय खंडाईत यांच्यावर वाडी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस खत व कीटकनाशक उत्पादनावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.