Fake Fertilizer : राज्यात खत विक्रीत अनियमितता करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. (Fake Fertilizer)
खत विक्रीत गैरप्रकार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांचे परवाने पूर्वीप्रमाणे १५ दिवसांसाठी नव्हे, तर थेट सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. (Fake Fertilizer)
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सरकारकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.(Fake Fertilizer)
नायगावमध्ये तपासणीत उघडकीस आले प्रकार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात खताच्या दरवाढी आणि उपलब्धतेबाबत शेतकरी पुत्र संघर्ष समितीने तक्रार केली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी ५ डिसेंबर २०२५ रोजी कृषी विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांच्या अध्यक्षतेखाली विशेष भरारी पथक स्थापन केले.
या पथकाने ८ डिसेंबर २०२५ रोजी नायगाव येथील सात रासायनिक खत विक्री केंद्रांची तपासणी केली. तपासणीदरम्यान चार विक्रेत्यांनी निश्चित दरापेक्षा जास्त दराने खत विक्री केल्याचे, तर तीन विक्रेत्यांनी साठा उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना खत न दिल्याचे आढळून आले. त्यामुळे सातही विक्रेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीचे आदेश
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांना देण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
या विषयावर झालेल्या चर्चेत नाना पटोले, जयंत पाटील आणि अभिजीत पाटील यांनीही सहभाग घेतला.
राज्यभर मोठ्या प्रमाणात तपासण्या
बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू असल्याचेही कृषी मंत्र्यांनी सांगितले.
१ एप्रिल २०२५ पासून मार्च २०२६ पर्यंत राज्यातील १ लाख १४ हजार ८६० विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.
या तपासणीत
१५४३ विक्रेत्यांचे परवाने निलंबित,
११७४ परवाने रद्द,
२९५६ विक्री केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच २१४९ उत्पादनांची तपासणी करून ५२,९१० नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३४६२ नमुने अप्रामाणिक आढळले.
याशिवाय सुमारे ३१०० मेट्रिक टन खताचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणांमध्ये १४७ जणांवर पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना खताचा पुरेसा साठा
राज्यात सध्या खताचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना खताबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असेही कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले.
