श्यामकुमार पुरे
कधी बनावट बियाणे, तर आता बनावट खते! सिल्लोड तालुक्यातील मोढाखुर्द येथे 'लीप फर्टिलायझर्स अँड केमिकल्स' कंपनीने विनापरवाना बनावट खतांची निर्मिती व विक्री केल्याचा भांडाफोड झाला आहे. (Fake Fertilizer)
कृषी विभागाने केलेल्या जम्बो कारवाईत तब्बल १९ लाख ५ हजार रुपयांची खते, रॉ मटेरियल आणि रिकाम्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Fake Fertilizer)
कृषी विभागाच्या पथकाने या गोडाऊनवर छापा टाकत १९ लाख ५ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.(Fake Fertilizer)
ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजता सुरू होऊन शुक्रवारी पहाटे ६ वाजेपर्यंत चालली. सिल्लोड येथील कृषी अधिकारी प्रमोद डापके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लीप कंपनीचे मालक मोहन वसंतराव हिरे यांच्याविरुद्ध विनापरवाना खत निर्मिती, साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.(Fake Fertilizer)
पथकाला गोडाऊनमध्ये NPK 18-18-10, NPK 10-20-20, PROM, PDM, Zinc Solublizing Biofertilizer, Diatomite Silicon 60% granules, Phosphogypsum यांसारखी खते, लेबलविना गोण्या आणि रॉ मटेरियल सापडले. ही सर्व खते बेकायदेशीरपणे पॅकिंग करून विक्रीसाठी तयार ठेवली होती.
या कारवाईत विभागीय कृषी संचालक सुनील वानखेडे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख, तसेच तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने काम केले. कार्यवाहीदरम्यान पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे आणि पथकाचे सदस्य उपस्थित होते.
प्रमोद डापके यांनी सांगितले की, 'गोडाऊनमध्ये सापडलेल्या सर्व खतांचे नमुने सील करून छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतर भेसळीचे प्रमाण स्पष्ट होईल.'
दरम्यान, या प्रकरणात कंपनीने सिल्लोड तालुक्यातील अनेक खत विक्रेत्यांना हे बनावट खत पुरवले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कृषी विभागाला एका निनावी फोन कॉलमुळे या प्रकरणाची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ गुप्त पाळत ठेवून छापा टाकण्यात आला. ही कारवाई दीर्घकाळ गुप्ततेत ठेवण्यात आली होती. आणि कारवाईला गती मिळाली आणि अखेर शुक्रवारी सकाळी औपचारिक गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकऱ्यांना आधीच अतिवृष्टी, बियाण्यांचा अभाव आणि बाजारभावातील अनिश्चितता याचा ताण आहे. त्यात बनावट खतांचा धोका म्हणजे शेतकऱ्यांच्या माथी आणखी एक मोठे संकट उभे राहणार होते.
