Bogus Fertilizer : लासूर स्टेशन येथे विनापरवाना परदेशी रासायनिक खतांचा मोठा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे समोर आले असून, कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल ६८ गोण्या खत जप्त केल्या आहेत. (Fake Fertilizer)
खत विक्रेत्याजवळ परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासकीय कारवाईची तयारी करण्यात आली आहे. खरीप हंगाम सुरू होताच बनावट व विनापरवाना खते, बियाणे व औषधांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची हालचाल वाढू लागते. अशा प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी कृषी विभागाच्या भरारी पथकांनी सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Fake Fertilizer)
लासूर स्टेशनमधील मे. अभयकुमार इंदरचंद मुथा यांच्या कृषिसेवा केंद्रावर धाड टाकून ३ लाख रुपये किमतीच्या ६८ गोण्या रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला.(Fake Fertilizer)
काय आहे प्रकरण?
लासूर स्टेशन येथील कृषिसेवा केंद्रात विनापरवाना परदेशात तयार करण्यात आलेल्या रासायनिक खतांची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मंगळवारी (१ जुलै) पथकाने या दुकानावर छापा टाकला.
जप्त करण्यात आलेले खत
हायड्रोस्पीड कॅब मॅक्स (३८ गोण्या)
नोव्हाटेक प्रो (३० गोण्या)
हे दोन्ही खते हैद्राबाद येथील 'मुनारा अॅग्रो टेक्नॉलॉजी प्रा.लि.' कंपनीचे असून ते पोलंड व जर्मनी येथून आयात करण्यात आले होते. हे खत महाराष्ट्रात विक्रीसाठी अधिकृत परवान्याशिवाय आणले गेले होते.
परवाना नसल्याचे उघड
विक्रेता रोहित मुथा यांच्याकडे खत विक्रीचा परवाना नसल्याचे उघड झाले असून, त्यांनी हे खते कर्नाटकमधील बागलकोट येथील 'मे. धरीदेवर रायता सेवा केंद्र' यांच्याकडून आणल्याचे सांगितले. मात्र, संबंधित कंपनीला महाराष्ट्रात खत विक्रीसाठी कायदेशीर मान्यता नाही.
कायदेशीर कारवाई प्रस्तावित
या प्रकारामुळे कृषी विभागाने सदर विक्रेत्यावर कायदेशीर व प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा
विना परवाना खते विक्री करणे गंभीर गुन्हा आहे. कोणत्याही विक्रेत्याने जबरदस्तीने अनुदानित खतासोबत इतर उत्पादने खरेदी करण्यास सांगितल्यास, शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा.- हरिभाऊ कातोरे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक
कारवाईत सहभागी अधिकारी
सुनील बोरकर (कृषी संचालक, पुणे), प्रकाश देशमुख (विभागीय कृषी सहसंचालक), प्रकाश पाटील (कृषी विकास अधिकारी), हरिभाऊ कातोरे (जिल्हा गुणवत्ता निरीक्षक), श्रीकृष्ण बंडगर (विभागीय गुणनियंत्रक), बापूराव जायभाये (तालुका कृषी अधिकारी), प्राजक्ता रणसिंग, रवींद्र उराडे (कृषी अधिकारी) यांनी कारवाई केली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कृषी विभागाने पुन्हा एकदा कठोर कारवाई करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनीही बियाणे, खते आणि औषधे खरेदी करताना फक्त अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी आणि कोणत्याही शंका असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.