- रतन लांडगे
सततची नापिकी आणि वाढत जाणारा कर्जाचा डोंगर यामुळे शेतकरी बांधव आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. हारून वा मरून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही तर उलट परिस्थितीशी दोन हात करून व शेतात नवनवे प्रयोग करून प्रश्न सुटतात, हे आपल्या प्रत्यक्ष कर्तृत्वातून एका शेतकऱ्याने सिद्ध केले आहे.
पवनी तालुक्यातील भेंडाळा गावातील देवनाथ ताराचंद वैद्य, असं या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव. चार-साडेचार एकर जमीन. बरेचदा नापिकी व वाढत्या रोगांमुळे उत्पादन कमी होऊन हवा तसा नफा मिळत नव्हता. म्हणून वैद्य यांनी पारंपरिक शेतीसोबतच अर्धा-पाऊण एकर शेतात भाजीपाला लागवडीचा प्रयोग करण्याचं ठरवलं आणि आता गेल्या चार-पाच वर्षांपासून भाजीपाला लागवड करून स्वतःच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण केलाय.
पारंपरिक धान पिकाऐवजी वैद्य यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून आपल्या बागायती शेतीत वांगी, चवळी, भेंडी या भाजीपाल्याची लागवड केली. भातशेतीपेक्षा भाजीपाला शेतीत चांगला नफा मिळवून ते आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देत आहेत.
सर्व खर्च वजा जाता वर्षाला जवळपास ५० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो, असं ते आवर्जून सांगतात. या कार्यात त्यांच्या पत्नीचीही मोलाची साथ त्यांना लाभत आहे. हतबल होत चाललेल्या परिसरातील अन्य शेतकऱ्यांसाठी 'हा' प्रयोगशील व कष्टाळू शेतकरी जणू आदर्शच.
मी विचारही केला नव्हता की, भाजीपाला माझ्या आयुष्यात एवढा मोठा बदल घडवून आणेल. भाजीपाला लागवडीमुळे मला पुन्हा जगण्याची प्रेरणा मिळाली.
- देवनाथ वैद्य, शेतकरी, भेंडाळा
