वर्धा : राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे खरीप हंगाम २०२५ च्या 'ई-पीक पाहणी' नोंदणीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची आता 'ऑफलाइन' पद्धतीने पाहणी करून पिकांची नोंद घेतली जाणार आहे.
त्यासाठी आता शेतकऱ्याला १७ ते २४ डिसेंबरपर्यंत ग्रामस्तरीय समितीकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची शासनाने दिलेल्या मुदतीत पीक पाहणी नोंदणी झाली नाही, जिल्ह्यातील अशा अनेक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
कुठे आणि कसा करायचा अर्ज ?
ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव विहित मुदतीत पिकांची नोंद करता आली नाही, अशा शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे दिनांक १७ डिसेंबर ते २४ डिसेंबरपर्यंत पिकांची नोंद करण्याकरिता अर्ज सादर कराचे लागणार आहे.
आता ऑफलाइन ई-पीक पाहणी करता येणार
राज्यातील नैसर्गिक आपत्ती आणि तांत्रिक अडचणींमुळे जे शेतकरी शासनाने दिलेल्या मुदतीत ऑनलाइन ई पीक पाहणी करू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांना आता ऑफलाइन ई-पीक पाहणी करता येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची सातबाऱ्यावर पीक पाहणी नोंद झाली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावच्या महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करता येणार आहे.
पीक नोंदणी करणे कशासाठी महत्त्वाची?
शेतातील पिकांचा पेरा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर उतरविला जातो त्यामुळे जेव्हा अतिवृष्टी, दुष्काळ किंवा गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होते तेव्हा शासन मदत जाहीर करते. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर पिकांची नोंद असेल तरच शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जाते. त्यामुळे पीक नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवायसी करणे गरजेचे झाले आहे.
शेतकऱ्यांनी केवायसीसाठी ही कागदपत्रे तयार ठेवावी
शेतकऱ्यांनी ऑफलाइन इ-पीक पाहणीची नोंद घेण्यासाठी ऑफलाइन फॉर्म, सातबारा आणि आधार कार्ड ही कागदपत्रे तयार ठेवून ही कागदपत्रे तलाठ्याकडे द्यावी लागणार आहे. विहित मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.
