Join us

Dragon Farming : खडकाळ माळरानावर ठिबक सिंचनाद्वारे फुलतेय ड्रॅगन फ्रुटची शेती, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 16:43 IST

Dragon Farming : कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात खडकाळ व नापिक जमिनीत ड्रॅगन फ्रुटची शेती फुलविली.

- युवराज गोमासेभंडारा : कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोन क्षेत्रात एका तरुण शेतकऱ्याने रोहयो व कृषी विभागाच्या (Krushi Vibhag) योजनांतून, तसेच कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून खडकाळ व नापिक जमिनीत ३२०० झाडांच्या ड्रॅगन फ्रुटची शेती फुलविली. रामकृष्ण हातझाडे, रा. कोका, असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ड्रॅगन फ्रुट (Dragon fruit)  लागवडीसाठी जैविक खतांचा व मायक्रो न्यूट्रॉनचा, तसेच १४० खांबांचा वापर करून झाडांना आधार देण्याकरिता पीठ ताराचा वापर करण्यात आला. झाडांना ठिबक संचाद्वारे पाणी देत ८५ डिसीमील जागेत ३२०० झाडांची लागवड करण्यात आली. या पिकाला पावसाळ्यामध्ये पाच ते सहा, हिवाळ्यामध्ये दहा ते बारा दिवसांच्या, तर उन्हाळ्यामध्ये २० ते २२ दिवसांच्या अंतराने पाणी देण्यात येते.

काटेरी झाडांमुळे वन्यप्राण्यांचा त्रास अत्यल्पकोका, नवेगाव, सोनकुंड, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, चंद्रपूर या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात संसार आहे. भाजीपाला व धान पिकाचे अतोनात नुकसान होते. परंतु, ड्रॅगन फ्रुट काटेरी झाड असून या फळांना जंगली जनावरांचा कमी प्रमाणात त्रास होतो.

वर्धा येथे प्रशिक्षण, प्रगतिशील शेतकऱ्यांशी चर्चाकृषी विभागामार्फत ड्रॅगन फ्रुट व फळबाग लागवडीबाबत वर्धा येथे पाच शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठविले होते. पश्चिम महाराष्ट्रातील ड्रॅगन फुटच्या शेतीला दोनदा भेटी देत चर्चा करून फायदे, महत्व व बाजारभाव यासंबंधी माहिती गोळा केली.

कमी पाण्याची व खर्चाच्या शेती काळाची गरजजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट फळबागेत मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा. काळाची गरज लक्षात घेत कमी पाण्याच्या व कमी खर्चाची शेतीकडे वळावे, आपले जीवनमान उंचवावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अशोक जिभकाटे यांनी केले आहे.

ड्रॅगन फ्रुट नर्सरी सांगोला (सोलापूर) येथून रोपे आणून जुलै महिन्यामध्ये झाडांची लागवड केली. त्यासाठी कृषी सहायक डी. वाय. हातेल यांनी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून ड्रॅगन फ्रूट शेती फुलविली.- रामकृष्ण हातझाडे, शेतकरी, कोका.

कोका परिसरातील शेतकऱ्यांनी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा. फळबाग लागवडीकडे वळावे. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनांचा लाभ घ्यावा.- डी. वाय. हातेल, कृषी सहायक, कोका.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीशेतकरीफळेकृषी योजना